किन्नौर, 20 डिसेंबर : किन्नौर येथे (Kinnaur) फिरण्यासाठी आलेल्या हरियाणाच्या (Haryana) महिलेला सेल्फी घेणं (Selfy) इतकं महागात पडलं की त्यात तिचा मृत्यू झाला. किन्नौरच्या कल्पा आणि रोघी गावादरम्यान हजारो फूट खोल दरी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. याला सुसाइड पॉइंट (Suicide Point) अशा नावानेही ओळखलं जातं. येथे हरियाणामधून फिरण्यासाठी आलेली महिला सुसाइड पॉईंट येथून सेल्फी घेत होती. अचानक तिचा पाय घसरला आणि ती खोल दरीत पडली. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला आहे.
पोलिसांनी सांगितलं की, गेल्या दोन वर्षात येथे दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारची आहे. हरियाणाची एक महिला किन्नोर येथील कल्पामध्ये फिरण्यासाठी आली होती. काल महिला आणि तिच्यासोबत वाहन चालक सुसाइड पॉइंटच्या दिशेने फिरण्यासाठी निघाले होते. त्यावेळी महिला आपल्या फोनमधून सेल्फी घेत होती. यादरम्यान महिलेचा पाय घसरला आणि ती खोल दरीत कोसळली. सायंकाळी उशिरा पोलिसांना या घटनेची सूचना दिली. ज्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केलं. मात्र अंधार असल्या कारणाने रात्री महिलेला शोधता आलं नाही. दिवसा पोलिसांनी पुन्हा महिलेला शोधण्यास सुरुवात केली, यावेळी महिलेचा मृतदेह सापडला.
हेही वाचा-गरीब आणि दलित वस्तीवर नजर; मदतीच्या बहाण्याचे मोठं पॅकेज, धर्मपरिवर्तनाचा खेळ!
एसडीएम कल्पा मेजर अवनींद्र शर्मा यांनी सांगितलं की, महिला हरियाणातील सिररा येथून आहे. काल (शनिवारी ) सुसाइड पॉइंट येथून महिला दरीत कोसळल्याची माहिती मिळाली होती. ज्यानंतर सातत्याने पोलीस होमगार्डची टीम महिलेचा शोध घेत होती. आता महिलेचा मृतदेह सापडला आहे आणि या प्रकरणात पोलीस तपास करीत आहे. सोबतच महिलेच्या गाडीचा चालक याचीही चौकशी केली जात आहे. पोलिसांनी महिलेच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती दिली आहे.