कठुआ बलात्कार तपासाची जबाबदारी कोल्हापूरच्या 'या' मराठी पोलीस अधिकाऱ्याकडे!

कठुआ बलात्कार तपासाची जबाबदारी कोल्हापूरच्या 'या' मराठी पोलीस अधिकाऱ्याकडे!

संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या कठुआ मधील बलात्कार तपासाची जबाबदारी आता कोल्हापूर जिल्ह्यातील एका मराठी पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे.

  • Share this:

26 एप्रिल : संपूर्ण देशाला हादरवून सोडलेल्या कठुआमधील बलात्कार तपासाची जबाबदारी आता कोल्हापूर जिल्ह्यातील एका मराठी पोलीस अधिकाऱ्याकडे देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील कुरूकवाडी येथील श्रीधर पाटील हे आयपीएस आहेत. जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात घडलेल्या बालिका अत्याचार प्रकरणाने देश ढवळून निघाला. त्याच प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी आता श्रीधर यांच्यावर आहे.

कठुआ जिल्ह्यातही अद्यापही भीतीचं आणि संतापजनक वातावरण आहे. या परिस्थितीत या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदाची जबाबदारी कोल्हापूरच्या श्रीधर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आलीय. त्यामुळं पीडितेला न्याय देण्याची जबाबदारी आता श्रीधर पाटील यांच्यावर असणार आहे.

शाहूवाडी तालुक्यातील श्रीधर पाटील हे 2010 च्या आयपीएस बॅचचे आहेत. त्यांचा प्रशिक्षण कालावधी हा जम्मू-काश्मीरमध्येच गेला आहे. तसेच त्यांचे पहिले पोस्टिंगसुद्धा श्रीनगर येथे झाल होतं. यानंतर अवंतीपूर, कुलगाम आदी जिल्ह्यांत त्यांनी स्वतंत्रपणे पोलीस अधीक्षक म्हणून चांगले काम केले आहे.

पाटील यांना जम्मू-काश्मीरच्या एकूण परिस्थितीचा चांगला अभ्यास आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था कुशलपणे सांभाळण्याची त्यांची सर्वोच्च क्षमता असल्याचे त्यांनी यापूर्वी दाखवून दिले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून पाटील यांना देशासह जगभरातील माध्यमांचे लक्ष लागून राहिलेल्या कठुआ जिल्ह्याचा पदभार देण्यात आला आहे.

 

First published: April 26, 2018, 7:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading