प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिकांना 'भारतरत्न'!

प्रणव मुखर्जी, नानाजी देशमुख आणि भुपेन हजारिकांना 'भारतरत्न'!

भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 25 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतरत्न पुरस्कारांची घोषणा केली आहे. माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलंय. त्याचबरोबर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगितकार भुपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.


राष्ट्रपती भवनाने शुक्रवारी रात्री एक पत्रक काढून ही घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन भारतरत्न पुरस्कारांची घोषणा करून पुन्हा एकदा आश्चर्याचा धक्का दिलाय. प्रणव मुखर्जी हे गेल्या पाच दशकांपासून अधिक काळ देशाच्या राजकारणात आहे.


प्रणव मुखर्जी

प्रणव मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. त्यांनी 25 जुलै 2012 ला राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. ते या पदावर 25 जुलै 2017 पर्यंत होते. 1984मध्ये ते इंदिरा गांधी यांच्या मंत्रीमंडळात अर्थमंत्री होते. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलं. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना युपीए-1, आणि 2 मध्ये त्यांनी परराष्ट्र, अर्थ अशी महत्त्वाची खाती सांभाळली.  50 पेक्षा जास्त मंत्री गटाचे ते अध्यक्ष होते.


काही काळासाठी हे काँग्रेसमधून बाहेरही गेले होते. त्यानंतर गांधी घराण्याचा त्यांच्यावरचा विश्वास कमी झाला. राजकारण आणि काँग्रेसचे इन्सायक्लोपीडीया असंही त्यांना म्हटलं जातं. पंतप्रधानपदाचे दावेदारही त्यांना समजलं जातं होतं. मात्र त्यांना ते पद कधी मिळालं नाही. नंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसने त्यांचं नाव पुढे करून त्या सगळ्यांची भरपाई केली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रणव मुखर्जी यांचे संबंध उत्तम होते. प्रणव मुखर्जी यांनी वडिलांप्रमाणे मला अनेक गोष्टी शिकवल्या असं मोदींनी म्हटलं होतं. 2018 च्या संघाच्या विजया दशमी उत्सवाला प्रणव मुखर्जींनी नागपूरला जाऊन हजेरी लावली. त्यावरून देशभर वादही झाला होता. नागपूर भेटीत त्यांनी संघ संस्थापक डॉ. हडगेवारांना भारताचे महान सुपूत्र असंही म्हटलं होतं.


नानाजी देशमुख


नानाजी देशमुख हे संघाचे स्वयंसेवक. महाराष्ट्रातल्या वाशीम इथं 11 ऑक्टोबर 1916 त्यांचा जन्म झाला. ते जनसंघाचे नेते होते. नंतर सक्रिय राजकारणातून निवृत्त होत त्यांनी समाजकार्याला वाहून घेतलं. मध्य प्रदेशातल्या चित्रकूट इथं मोठं काम उभं केलं आहे. 1977 मध्ये जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर त्यांना मंत्रीपद देण्यात आलं होतं.


मात्र 60 वर्ष झालेल्या व्यक्तींनी मंत्रीपद स्वीकारू नये असं सांगित त्यांनी ते पद घ्यायला नकार दिला. देशातल्या सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे अत्यंत सलोख्याचे संबंध होते. 27 फेब्रुवारी 2010मध्ये त्यांचं निधन झालं.


भुपेन हजारिका

आसमी संगीत जगभर पोहोचवत चित्रपट सृष्टीला अनेक अजरामर गीतं देण्याचं काम भुपेन दा यांनी केलं. आसाम जिल्ह्यातल्या तिनसुखीया जिल्ह्यात  8 सप्टेंबर 1926 ला त्यांचा जन्म झाला. गीतकार, संगीतकार आणि गायक म्हणून त्यांनी चित्रपट सृष्टीवर आपली अमीट छाप सोडली.


फक्त आसमीच नाही तर त्यांनी हिंदीसहीत अनेक भारतीय भाषांमधली त्यांची गाणी प्रचंड गाजली. "दिल हूम हूम करे" आणि "ओ गंगा तू बहती है क्यों" ही त्यापैकी महत्त्वाची गाणी. 5 नोव्हेंबर 2011ला त्यांचं निधन झालं.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2019 08:42 PM IST

ताज्या बातम्या