निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारीलाही फाशी नाही? तारीख पुन्हा टळणार

निर्भयाच्या दोषींना 1 फेब्रुवारीलाही फाशी नाही? तारीख पुन्हा टळणार

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी आरोपींना 1 फेब्रुवारी रोजी होणारी फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात येऊ शकते, अशी सूत्रांची माहिती आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 जानेवारी : निर्भया सामूहिक बलात्कारानं (Nirbhaya Gang Rape Case) दिल्लीसह संपूर्ण देश हादरला होता. निर्भयाची स्वत:शीच असलेली लढाई संपली, पण तिला न्याय मिळवून देणाऱ्यांनी तो लढा तसाच सुरू ठेवला. अखेर याप्रकरणी  दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पण, आता 1 फेब्रुवारी रोजी होणारी फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात येऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. चूक सुधारण्यासाठी करण्यात येणाऱ्या याचिकेव्यतिरिक्त दया याचिकेचा पर्यायही अक्षयकडे उपलब्ध आहे. म्हणूनच, 1 फेब्रुवारीला होणारी फाशी टळण्याची शक्यता आहे.

अक्षयने मंगळवारी क्यूरेटिव याचिका दाखल केली होती. याबाबतची सुनावणी गुरुवारी होणार आहे. न्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायधीशांचं खंडपीठ सुप्रीम कोर्टात गुरुवारी दुपारी 1 वाजता या प्रकरणातला एक दोषी अक्षय ठाकूरच्या शिक्षेच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

शिक्षा होण्यास विलंब होणार?

याप्रकरणी निर्भयाच्या आईचे वकील जितेंद्र झा यांनी सांगितले की, ‘मला असं वाटतं आणखी 74 ते 75 दिवस लागतील. डेथ वॉरंट जारी झालं असलं तरी 31 जानेवारी दुपारी 12 वाजेपर्यंत दोषींनी राष्ट्रपतीकडे दया याचिका केली तर, फाशी थांबू शकते. कोर्टाने गुन्हेगारांसाठी नवीन डेथ वॉरंट जारी केलं आहे. गुन्हेगारांचे वकील हे प्रकरण आणखी लांबवू पाहात आहेत. तसेच, एका गुन्हेगाराच्या वयावरून आक्षेप घेतला जात आहे.’

‘तिहार’मध्ये लैंगिक शोषण

याआधी दोषी आरोपी मुकेशच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात सांगितलं की, ‘मुकेशचं तिहार तुरुंगात लैंगिक शोषण केलं गेलं.’ राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्यानंतर याविरोधात मुकेशने सुप्रीम कोर्टात अर्ज केला आहे.

'निर्भया' प्रकरणानं देश हादरला

16 डिसेंबर, 2012 रोजी 23 वर्षीय तरुणी आपल्या मित्रासोबत दक्षिण दिल्लीत फिरण्यासाठी गेली होती. यावेळी चित्रपट पाहून घरी परतत असताना बस स्टँडवर मित्रासोबत बसची वाट पाहत उभी होती. यावेळी तिथून जाणाऱ्या एका खासगी बसमधून त्यांनी प्रवास केला. एका अल्पवयीन मुलासोबत सहा नराधमांनी तिच्यावर चालत्या बसमध्ये बलात्कार केला. तिला अमानुष मारहाणही केली. यानंतर पीडितेला बसमधून फेकून देण्यात आलं. गंभीररीत्या जखमी निर्भयावर रुग्णालयात उपाचार झाले. त्यानंतर तिला उपचाराकरिता एअरलिफ्ट करून सिंगापूरला घेऊन जाण्यात आलं. अखेर तिनं 29 डिसेंबर, 2012 रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. निर्भयाच्या चार गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानेही त्यावर शिक्कामोर्तब केलं आहे. एक गुन्हेगार अल्पवयीन असल्याने याआधीच त्याची रिमांड होममध्ये रवानगी करण्यात आली होती. तिथून शिक्षा भोगल्यावर त्याची सुटका झालेली आहे. एकाचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाला. उर्वरित चार गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला फाशी देण्याचं निश्चित करण्यात आलं होतं.

First published: January 29, 2020, 9:53 PM IST

ताज्या बातम्या