नवी दिल्ली 17 नोव्हेंबर: देशात कोरोनाचा (Coronavirus) आलेख घसरणीला आला आहे. सलग गेल्या 45 दिवसांपासून नव्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी दिली आहे. केंद्र आणि राज्याने केलेले एकत्रित प्रयत्न, चाचण्यांची वाढवलेली संख्या आणि इतर उपाय योजनांमुळे आलेख घसरणीला लागल्याचंही ते म्हणाले. असं असलं तरी देशात कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे नागरीकांनी सरकारने दिलेल्या सर्व सूचनांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलं.
ज्यांना कोरोनाची लक्षणं आढळून आलीत त्यांनी लगेच कोविड टेस्ट करून घेतली पाहिजे. त्यांच्याकडे दुलर्क्ष करून चालणार नाही. जेवढ्या लवकर उपचार मिळतील आणि संपर्कात आलेल्यांना आयसोलेट केलं जाईल तेवढ्या लवकर त्याचा प्रसार थांबेल असंही ते म्हणाले.
दिल्लीत सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने केंद्र सरकारने तातडीने उपाययोजना करण्यासाठी पावलं टाकली आहेत असंही ते म्हणाले. दिल्लीमध्ये देशातील सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीमध्ये एका दिवसात (16 नोव्हेंबर) 3800 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे आणि तर एका दिवसात 99 मृत्यूंची नोंद झाली आहे. दिल्ली एनसीआर शहरांत म्हणजेच गुरुग्राम, फरिदाबाद, गाझियाबाद आणि नोयडा याठिकाणी देखील नवे 1441 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील कोरोना रुग्णांचा ग्राफ चढता असल्याने चिंता वाढली आहे.
कल्याणमध्ये उच्चभ्रू वस्तीतील इमारतीमध्ये घराला आग, मोठा धोका टळला
दिल्लीमध्ये कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेता गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी कमान सांभाळली आहे. त्यांनी गृह मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन दिल्लीतील परिस्थिती कशी नियंत्रणात आणता येईल याबाबत चर्चा केली आहे. यानंतर दिल्लीतील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी एक आराखडा तयार करण्यात आला आहे.
दरम्यान, दिल्लीने चिंता वाढवली असताना दुसरीकडे महाराष्ट्रातून मात्र आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या 160 दिवसांतील सर्वात कमी नव्या रुग्णांची नोंद (16 नोव्हेंबर) महाराष्ट्रात झाली आहे. एका दिवसात महाष्ट्रात अडीच हजार रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी कोरोना संक्रमणाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर असणारा महाराष्ट्र आता चौथ्या क्रमांकावर आहे. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रममे दिल्ली, पश्चिम बंगाल आणि केरळ आहे.
पुण्यात मिठाईचं दुकान उचकटून चोरी करणाऱ्या झुरळ्याला पोलिसांनी केलं थेट गजाआड
महाराष्ट्रात गेल्या 175 दिवसातील निचांकी मृत्यूची देखील नोंद झाली आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये पहिल्यांदाच निचांकी मृत्यूची नोंद झाली. सोमवारी (16 नोव्हेंबर) 60 जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात 3,001 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 16,18,380 एवढी झाली आहे. तर 2,535 नवे रुग्ण आढळून आलेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे (Recovery Rate) 92.49 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सध्या 84 हजार 386 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.