मराठी बातम्या /बातम्या /देश /

‘या’ मशिदीची हिंदू आणि शीख सांभाळतात जबाबदारी, नमाज पठणासह होतात सर्व धार्मिक विधी

‘या’ मशिदीची हिंदू आणि शीख सांभाळतात जबाबदारी, नमाज पठणासह होतात सर्व धार्मिक विधी

'या' मशिदीची जबाबदारी हिंदू आणि शीख सांभाळतात.

'या' मशिदीची जबाबदारी हिंदू आणि शीख सांभाळतात.

मागच्या दशकांपासून शीख (Sikh ) आणि हिंदू (Hindu ) ग्रामस्थांकडून या मशिदीची व्यवस्था पाहिली जाते. त्यांच्यासाठी हे पवित्र श्रद्धास्थान आहे.

    मुंबई, 16 ऑगस्ट : दोन धर्मांमध्ये होणारे वाद हा काही नवा विषय नाही. त्यात भारतात हिंदू आणि मुस्लिम वादाची उदाहरणं तर आपल्याला सातत्याने कानावर पडत असतात. पण हे धार्मिक वाद आणि भेदभाव सगळ्याच ठिकाणी नाहीत. देशात अनेक ठिकाणी धार्मिक सलोखा जपला जातो. त्याचच एक उदाहरण पंजाबमधील एक मशीद आहे. लुधियानामधील (Ludhiana ) हेडॉन बेट (Hedon Bet ) गावातील  मशीद (Mosque) धार्मिक सलोख्याचं प्रतीक ठरली आहे.  या संदर्भात द ट्रिब्यूनने वृत्त दिलंय. धार्मिक एकतेचं उदाहरण फाळणीनंतर या गावात एकही मुस्लिम व्यक्ती राहत नाही, तरीही मशिदीत रोज नमाज अदा केली जाते आणि दिवा लावला जातो. मागच्या अनेक दशकांपासून शीख (Sikh ) आणि हिंदू (Hindu ) ग्रामस्थांकडून या मशिदीची व्यवस्था पाहिली जाते. त्यांच्यासाठी हे पवित्र श्रद्धास्थान आहे. या मशिदीची देखभाल करणाऱ्या एका सूफी संताचं निधन झाल्यानंतर गावातल्याच प्रेमचंद नावाच्या एका 56 वर्षीय ग्रामस्थाने 2009 मध्ये या मशिदीच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली होती, तेव्हापासून आतापर्यंत तेच या मशिदीची काळजी घेतात आणि तिथल्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात. प्रेमचंद दिवसातून दोनदा मशिदीत येतात, परिसर स्वच्छ करतात, नमाज पठण करतात आणि संध्याकाळी दिवा लावतात. त्यांच्या या नित्यक्रमात मागच्या अनेक वर्षांत कोणताही बदल झालेला नाही. “इथे आल्याशिवाय आणि सूफी संतांनी सांगितलेली काही वाक्यं ऐकल्याशिवाय माझा दिवसच पूर्ण होत नाही. मी आजारी असूनही माझा विश्वास, माझी श्रद्धा मला या ठिकाणी रोज आणते,”असं प्रेमचंद सांगतात. धार्मिक सलोखा जपणाऱ्या या मशिदीत दरवर्षी मे महिन्यात लंगरचं म्हणजे भंडाऱ्याचं आयोजन केलं जातं. या माध्यमातून फाळणीच्या वेळी गाव सोडून गेलेल्या मुस्लिम कुटुंबांच्या स्मरणार्थ संपूर्ण गावाला जेवण दिलं जातं. स्वातंत्र्यदिनाचा इतका गवगवा का? आनंद महिंद्रांनी हा फोटो पोस्ट करत दिले उत्तर 68 वर्षीय ग्रामस्थ अमरसिंग यांनी गावातल्या जुन्या आठवणी सांगितल्या. ते म्हणाले, “गावात जवळजवळ 50 मुस्लिम कुटुंबं राहत होती. ते रोज नमाज अदा करायचे. आता गावात एकही मुस्लिम कुटुंब उरलं नसलं तरीही त्यांच्या प्रार्थनास्थळाची काळजी घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.” गावचे सरपंच गुरपालसिंग यांचं कुटुंब 1947 मध्ये सियालकोटहून (Sialkot) येथे आलं होतं. ते म्हणाले, “आपण या ‘रब्ब दा घर’ची काळजी का घेऊ शकत नाही? आमच्या गावात गुरुद्वारा (Gurdwara) आणि मंदिरही (Temple) आहे, पण ही मशीदही आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. प्रत्येक धर्माला बांधून ठेवणाऱ्या एका देवाची आम्ही सेवा करत आहोत. ही मशीद 1920 च्या आसपास बांधली गेली असल्याने ती पुरातत्वीयदृष्ट्या (Archaeological) महत्त्वाची आहे. आमचं गाव मशिदीच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे; पण आता सरकारनेही तिचं जतन केलं पाहिजे." धार्मिक वादाची अनेक उदाहरणं कानावर पडत असताना हेडॉन बेट गावातील ग्रामस्थ ज्याप्रमाणे या मशिदीत सेवा करून सलोखा जपत आहेत, ते नक्कीच अभिमानास्पद आहे.
    First published:

    Tags: Hindu, Muslim, Punjab

    पुढील बातम्या