नवी दिल्ली 6 सप्टेंबर: चोरून कधी श्रीमंत होता येत नाही असं म्हणतात. 26 वर्षांपूर्वी 2,212 रुपयांनी फसवणं एका व्यक्तिला चांगलंच महागात पडलं. कारवाई टाळण्यासाठी आता त्याला 55 लाख रुपये द्यावे लागणार असून जमा केलेले सर्वच पैसे आता जाणार आहेत. हे प्रकरण दिल्लीतलं असून शेअर मार्केटमध्ये काम करणाऱ्या दलालाच्या मॅनेजरने त्यांची फसवणूक केल्याचं प्रकरण आहे. महेंद्र कुमार शारदा असं त्या लबाड मॅनेजचं नाव आहे. 1994मध्ये ते या दलालांकडे नोकरीला होते. त्यांनी मालकाच्या नावचं खोटं बँक अकाऊंट तयार करून 2,212 रुपयांचा चेक दिला.
मालकाच्या जेव्हा ही फसवणूक लक्षात आली तेव्हा त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली. नंतर हे प्रकरण कोर्टात गेले. तेव्हापासून महेंद्र कुमार हे कोर्ट कचेऱ्या करत आहेत.
एवढ्या वर्षात हे प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात गेलं. आता कोर्टाच्या हेलपाट्यांना कंटाळलेल्या महेंद्र कुमार यांनी आता तडजोडीचा प्रस्ताव दिला आहे.
ब्राझीलला मागे टाकत भारत दुसऱ्या क्रमांकावर, रुग्णांची संख्या 41 लाखांच्या जवळ
50 लाख रुपयांमध्ये तडजोड करण्यास तयार असल्याचं त्यांनी सांगितलं. तर एवढी वर्ष कोर्टबाजी करण्यापेक्षा तडजोड का केली नाही? न्यायालयाचा का वेळ घेतला? असे ताशेरे ओढत न्यायालयाने त्यांना 5 लाखांचा दंड केला.
त्यामुळे महेंद्र कुमार यांना तडजोडीचे 50 लाख आणि दंडाचे 5 लाख असा 55 लाखांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे. एक चूक किती महाग पडू शकते याचा अनुभव महेंद्र कुमार यांना आला असून स्वत: जवळ असलेलं नसलेलं सगळंच गमाविण्याची वेळ येणार आहे.
या प्रकरणाची सर्व सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालय आता त्यावर निकाल देणार आहे.