News18 Lokmat

पंतप्रधान मोदींसहीत महत्त्वाच्या नेत्यांच्या हत्येचा कट, मौलवी आहे 'म्होरक्या'

गुप्तचर संस्थांनी काही दिवसांपूर्वीच असा हल्ला होऊ शकतो याची सूचना दिली होती.

News18 Lokmat | Updated On: Dec 26, 2018 06:31 PM IST

पंतप्रधान मोदींसहीत महत्त्वाच्या नेत्यांच्या हत्येचा कट,  मौलवी आहे 'म्होरक्या'

नवी दिल्ली 26 डिसेंबर : राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. देशभर साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणे आणि आत्मघाती हल्ल्याच्या मदतीने राजकीय नेत्यांच्या हत्या करण्याचा कट या अतिरेक्यांनी आखला होता.  NIA ने त्यांच्या मनसुब्यांना उधळून लावले आहे. NIA ने उत्तर प्रदेश आणि दिल्लीत 17 ठिकाणी छापे टाकून 10 अतिरेक्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि देशी रॉकेट लॉन्चर्स जप्त करण्यात आले आहेत.


ISI या दहशतवादी संघटनेसारखं मोड्युल या अतिरेक्यांनी विकसित केलं होतं. त्यांच्याकडून साडेसात लाख रुपये रोख, 100 मोबाईल्स 150 सीमकार्ड आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू जप्त करण्यात आल्याची माहिती NIA चे आयजी अलोक मित्तल यांनी दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह महत्त्वाचे राजकीय नेते या अतिरेक्यांच्या हिट लिस्टवर होते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हा कट उधळल्यानंतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात येत आहे. देशभरातली महत्त्वाची ठिकाणं, राजकीय नेते, संस्था, गर्दीची ठिकाणं लक्ष्य करण्याचा अतिरेक्यांचा डाव होता. अतिरेक्यांच्या हालचालीची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळताच त्यांनी तातडीने कारवाई करत अतिरेक्यांचा कट उधळून लावला.

Loading...


हा आहे म्होरक्या


अतिरेक्याची ही टोळी तयार करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव मुफ्ती सोहील असं आहे. मुफ्ती हा दिल्लीत राहात होता. तो मुळचा उत्तर प्रदेशातल्या अमरोहा इथला आहे. एका मशिदीत तो मौलवी म्हणून काम करत होता.

या मुफ्तीनेत इतर तरुणांना भडकवून आपल्या जाळ्यात ओढले आणि एक गट स्थापन केला. 'हरकत उल परब ए इस्लाम ' असं या गटाचं नाव आहे.


या गटाने देशी रॉकेट लॉन्चर्सही तयार केले होते.  अमरोहा, हापूर, मीरत लखनऊ सहीत 17 ठिकाणांवर NIA च्या पथकाने एकाच वेळी छापे घातले आणि मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त केला.

31 डिसेंबर आणि 26 जानेवारीला देशभर दहशतवादी हल्ले घडविण्याची या अतिरेक्यांची योजना होती.


गुप्तचर संस्थांनी काही दिवसांपूर्वीच असा हल्ला होऊ शकतो याची सूचना दिली होती. या प्रकरणाचे धागे दोरे मिळाल्यानंतर त्यांनी काही लोकांवर पाळत ठेवली आणि नंतर छापे घातले. चौकशी आणि कारवाई अजुनही सुरूच असल्याची माहिती NIA चे आयजी अलोक मित्तर यांनी दिली.बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2018 05:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...