जलालाबाद 7 नोव्हेंबर: दररोज घरात स्वयंपाकासाठी गॅस सिलेंडरचा वापर हा सगळ्यांच्या जगण्याचा भाग झाला आहे. अत्यावश्यक असणारं हे सिलेंडर जर काळजी घेतली नाही तर जीवघेणं ठरू शकतं. याच्या अनेक घटना आत्तापर्यंत समोर आल्या आहेत. उत्तर प्रदेशातल्या (Uttar Pradesh) शामली जिल्ह्यातलं जलालाबद शहरही शनिवारी सिलेंडर स्फोटांनी (cylinder blast) हादरून गेलं असून त्याचा LIVE VIDEO व्हायरल झाला आहे. त्या स्फोटांचा आवाज आणि भीषणता पाहून थरकाप उडाल्याशीवाय राहणार नाही.
जलालाबादमधल्या एका उपनगरात ही घटना घडली. एका घरामध्ये गॅस सिलेंडरच्या पाईप लिक झाला होता. त्यातून गॅस बाहेर आला आणि त्यामुळे आग लागली. आगीने हळूहळू वेग घेतला आणि सगळं घरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं.
घरात असलेल्या सिलेंडरचे स्फोट झाले. तब्बल 9 ते 10 स्फोट झाल्याचं LIVE VIDEO पाहिल्यावर लक्षात येतं. त्या स्फोटांचा आवाज एवढा भीषण होता की ते ऐकूनही धक्का बसू शकतो. या आगीत 1 महिला आणि अन्य दोन जण भाजले गेले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या स्फोटांमुळे घराचं छत उडून गेलं आहे. घटनेची माहिती कळताच स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तर फायर ब्रिगेडने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. या आग आणि स्फोटांमुळे आजुबाजुंच्या घरांनाही तडे गेले आहेत. तर काचाही फुटल्या आहेत.
जलालाबाद (उत्तर प्रदेश) : घरात असलेल्या गॅस सिलेंडरच्या पाईपमधून गॅस गळती झाली आणि घराला आग लागली. त्या आगीत घरामध्ये असलेल्या सिलेंडरचे भीषण स्फोट झाले. pic.twitter.com/4ThkgrdbhB
— News18Lokmat (@News18lokmat) November 7, 2020
घरात सिलेंडरचा वापर करताना सुरक्षा नियमांचं पालन केलं पाहिजे असं वारंवार सांगितलं जातं. मात्र अनेक वर्ष त्याची साधी तपासणीही केली जात नाही. दरवर्षी सिलेंडरचा गॅस पाईप बदलणं आवश्यक असतं मात्र तीही काळजी घेतली जात नाही त्यामुळे अशा घटना घडतात असं फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.