नवी दिल्ली 21 जून : पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवाद्यांविरुद्ध सुरक्षा दलांनी धडक कारवाई केली, मात्र धोका कमी झालेला नाही. दहशतवादी आता LPG सिलेंडर पासून IED तयार करत असल्याची माहिती गुप्तचर सुत्रांनी दिलीय. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलं सतर्क आहेत. तर देशभरही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुलवामानंतर सुरक्षा दलं अधिक सतर्क झाल्याने IED स्फोटकं बाळगणं दहशतवाद्यांना अवघड झालंय त्यामुळे ते नवा डाव खेळत आहेत.
मंदिरही टार्गेटवर
श्रीलंकेत एप्रील महिन्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर आता भारतात धोका वाढला आहे. इस्लामीक स्टेट म्हणजेच IS ने आता भारतावर आपलं लक्ष केंद्रीत केल्याची माहिती गुप्तचर सूत्रांनी दिली आहे. भारतातली मंदिरं आणि चर्चेस IS च्या निशाण्यावर आहेत. श्रीलंकेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे NIA ने नुकतच तामिळनाडूतल्या कोयंबतूरमधून IS च्या 4 समर्थकांना अटक केलीय त्यामुळे सुरक्षा दलांची चिंता वाढली असून देशभर संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे.
कोयंबतूरला ज्या 4 लोकांना अटक करण्यात आली होती त्यात श्रीलंका हल्ल्याच्या मुख्य आरोपी जरान हाशिमीचा फेसबुक मित्र मोहम्मद अजरुदीनचाही समावेश आहे. त्याचबरोबर शाहजहां, मोहम्मद हुसैन आणि शेख सैफुल्लाहला अटक करण्यात आलीय.
भारतातल्या धार्मिक स्थळांवर हल्ले करून तणाव वाढवलं आणि सामाजिक शांतता भंग करण्याचा या दहशतवाद्यांचा डाव आहे. ISने भारतात आपला स्लिपर सेल तयार केलाय. त्याच्या माध्यमातून नवीन तरुणांना भडकवून त्यांना दहशतवादासाठी तयार केलं जातं.
केरळमधूनही झाली होती अटक
2016 मधील ISIS कासरगोड मॉडयूल प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने काही महिन्यांपूर्वी केरळमधून रियास अबुबाकर याला पालकड येथून अटक केली होती. NIAने केलेल्या चौकशीत रियास याने अनेक धक्कादायक खुलासे केले होते. रियासला श्रीलंकेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे केरळमध्ये आत्मघाती हल्ले करायचे होते. तसेच तो ISIS या दहशतवादी संघटनेच्या अनेक दहशतवाद्यांशी इंटरनेटच्या माध्यमातून संपर्कात होता.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा