पुलवामात पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, 10 जखमी

जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासांत भारतीय जवानांवर पाच दहशतवादी हल्ले झाले. यानंतर भारतीय लष्कराकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 18, 2019 09:24 PM IST

पुलवामात पोलीस स्टेशनवर ग्रेनेड हल्ला, 10 जखमी

श्रीनगर 18 जून : जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा इथं दहशतवाद्यांनी सलग दुसऱ्या दिवशीही हल्ला केला. दहशतवाद्यांनी पुलवामा पोलीस स्टेशनवर हा हल्ल्याचा प्रयत्न केला. मोटरसायकलवर आलेल्या काही जणांनी पोलीस स्टेशनच्या दिशेने ग्रेनेड फेकला. मात्र तो स्टेशनच्या बाहेरच फुटल्याने 10 नागरिक जखमी झाले. त्यातल्या तीघांची प्रकृती गंभीर आहे. सुरक्षा दलांनी परिसराची घेराबंदी केली असून दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहिम सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांकडून जवानांना टार्गेट केलं जात आहे.  जम्मू-काश्मीरमध्ये 24 तासांत भारतीय जवानांवर पाच दहशतवादी हल्ले झाले. यानंतर भारतीय लष्कराकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हल्ल्यांत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. मात्र, या भ्याड हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत असताना एका मेजरसह चार जवान शहीद झाले आहेत. तसंच एका अधिकाऱ्यासह 18 जवान आणि दोन स्थानिक देखील जखमी झाले आहेत.

अनंतनाग चकमक, मेजर शहीद

अनंतनाग परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना सोमवारी (17 जून) पहाटे मिळाली होती. यानंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये मेजर केतन शर्मा शहीद झाले तर अन्य अधिकारी आणि दोन जवान जखमी झालेत. या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यातही जवानांना यश आलं.

18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहिम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहिम सुरू आहे.


'ऑपरेशन ऑल आऊट'

'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहिम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळी आहे.

या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2019 09:24 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close