नझीर अहमद वाणी: आधी दहशतवादी, नंतर लष्करी अधिकारी; आता मरणोत्तर अशोक चक्राचा मानकरी

नझीर अहमद वाणी: आधी दहशतवादी, नंतर लष्करी अधिकारी; आता मरणोत्तर अशोक चक्राचा मानकरी

शहीद लान्स नायक नझीर अहमद वाणी यांच्या शौर्यची कथा ऐकल्यानंतर तुम्ही त्यांना कधीच विसरणार नाही.

  • Share this:

जम्मू, 24 जानेवारी: तुम्हाला शहीद लान्स नायक नझीर अहमद वाणी आठवतात का?, तुमचे उत्तर नाही असेल तर हरकत नाही. कदाचित स्पर्धात्मक परीक्षेत काही गुण मिळवण्याच्या त्यांचे नाव लक्षात ठेवले जाईल. पण वाणी यांच्या शौर्यची कथा ऐकल्यानंतर तुम्ही त्यांना कधीच विसरणार नाही.

शहीद लान्स नायक नझीर वाणी यांचे नाव पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे भारत सरकारने शांततेच्या काळात दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च अशा अशोक चक्र पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. ही बातमी अशा वेळी येत आहे जेव्हा काश्मीर खोऱ्यातील बारामुल्ला जिल्ह्याला पहिला दहशतवादी मुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले आहे. काश्मीरमधील एक आशेचा किरण म्हणून शहीद वाणी यांना लक्षात ठेवणे गरजेचे आहे. युद्ध मग कोणतेही असो बंदुक हे त्यावरील उत्तर नव्हे हे वाणी यांनी सिद्ध करुन दाखवले.


काश्मीरमधील कुलग्रामच्या अश्मूजी गावाचे रहिवासी असलेले नझीर वाणी एकेकाळी स्वत: दहशतवादी होते. होय तुम्हाला वाचून धक्का बसेल एकेकाळी दहशतवादी असलेल्या वाणी यांनी देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिले. वाणी यांच्या सारख्या युवकांना काश्मीरमध्ये 'इख्वान' हा शब्द वापरला जातो. वाणी यांनी बंदुक हातात घेऊन बदला घेण्याचे ठरवले होते. पण काही काळातच त्यांना आपण चुकीच्या मार्गावर असल्याचे लक्षात आले. त्यांनी दहशतवादाचा मार्ग सोडला आणि भारतीय लष्करात सहभागी झाले.गेल्या वर्षी 23 नोव्हेंबर रोजी 34 राष्ट्रीय रायफल्समध्ये ड्यूटी करणाऱ्या वाणी यांना गु्प्तचर विभागाकडून शोपियांमधील बटागुड गावात 6 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली. दहशतवाद्यांकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र असल्याचे सांगण्यात आले होते. वाणी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर दहशतवादी ज्या मार्गाने पळ काढतील तो रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

दहशवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न करताना चकमक झाली. या चकमकीत 6 दहशतवादी ठार झाले. त्यातील दोघांचा खात्मा स्वत: वाणी यांनी केला. मात्र या चकमकीत ते गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. 26 नोव्हेंबर रोजी वाणी यांच्यावर त्यांचा गावी अंत्यसंस्कार करण्याआधी 21 तोफांची सलामी देण्यात आली. लष्करात दाखल झाल्यानंतर वाणी यांनी दाखवलेल्या शौऱ्यासाठी त्यांना दोन वेळा सेना मेडल मिळाले होते. यावरून त्यांच्या कामगिरीचा अंदाज येतो.शहीद वाणी यांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आणि आपल्या जखमी सहकाऱ्यांचे प्राण वाचवताना त्यांनी सर्वात मोठे बलिदान दिले. चकमकीच्या वेळी दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात गोळीबार केला. ग्रेनेड फेकण्यास सुरुवात केली. अशा परिस्थिती वाणी यांनी एका दहशतवाद्याला जवळून ठार मारले होते, असे राष्ट्रपतींच्या सचिवांकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.

वाणी यांचा मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. भारतात शांततेच्या काळात दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार आहे. अशोक चक्रानंतर क्रीर्ती चक्र आणि शौर्य चक्राचा असा क्रम लागतो. या वर्षी वाणी यांच्यासह चार अधिकारी आणि जवानांना कीर्ती चक्र आणि 12 जणांना शौर्य चक्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 24, 2019 01:45 PM IST

ताज्या बातम्या