Home /News /national /

गार्गी कॉलेज सामूहिक विनयभंग प्रकरणात 10 जणांना अटक, सीबीआय तपासाची मागणी

गार्गी कॉलेज सामूहिक विनयभंग प्रकरणात 10 जणांना अटक, सीबीआय तपासाची मागणी

सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्व तरुण जबरदस्तीने गार्गी कॉलेजचा गेट तोडून आत शिरल्याचे स्पष्ट दिसत आहे

    नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी : राजधानी दिल्लीतील गार्गी कॉलेजमध्ये विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी 10 बाहेरील विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे. दक्षिण दिल्लीचे डीसीपी अतुल ठाकूर यांनी ही माहिती दिली आहे. 6 फेब्रुवारी रोजी दिल्ली विद्यापीठाच्या गार्गी कॉलेजमध्ये झालेल्या वार्षिक उत्सवाच्या वेळी काही बाहेरील तरुणांनी कॉलेज कॅम्पसमध्ये प्रवेश केला होता आणि विद्यार्थिनींचा विनयभंग केला. यानंतर विद्यार्थिनींनी आपला निषेध नोंदवून फेब्रुवारी (सोमवार) निदर्शने केली आणि हौजखास पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. एनसीआरच्या शहरांमध्ये संशयितांचा शोध सुरू डीसीपी ठाकूर म्हणाले, हौजखास पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी 11 हून अधिक टीम काम करीत आहे. तांत्रिक तपशीलांच्या आधारावर तपास केला जात आहे. पोलिसांची पथके संशयितांना ओळख पटवण्यासाठी एनसीआरच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहेत. तपास पथकाने यासंदर्भात गार्गी कॉलेज प्रशासनाशीही चर्चा केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना अटक करण्य़ात आली आहे त्यांचे वय साधारण 18 ते 25 यामधील आहे. हे विद्यार्थी एनसीआरच्या सरकारी आणि खासगी विद्यापीठातील विद्यार्थी आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्व तरुण जबरदस्तीने गार्गी कॉलेजचा गेट तोडून आत शिरल्याचे स्पष्ट होत आहे. विद्यार्थिनींनी हौजखास पोलीस ठाण्यात IPC सेक्शन 452, 354, 509 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अनेकांशी विचारपूर केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपास टीप सातत्याने कॉलेज प्रशासनाच्या संपर्कात असून तपास सुरू आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं दरम्यान, विनयभंगाचे हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्यात सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआयला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे. ही याचिका वकील एम.एल. शर्मा यांनी दाखल केली आहे. शर्मा यांनी सांगितले की या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेत भारत सरकार आणि सीबीआय यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याप्रकरणाच्या सुनावणीसाठी शुक्रवारी हा विषय सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवला जाऊ शकतो. यामध्ये याचिकाकर्त्याने म्हटले आहे की, ज्या प्रकारे बाहेरील काही तरुणं महाविद्यालयात प्रवेश करुन मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या विद्यार्थिंनींसोबत गैरवर्तन करतात, अशा प्रकरणी सीबीआय तपासाची गरज आहे. काय झालं होतं त्या दिवशी फेब्रुवारीच्या 6 तारखेला दिल्लीच्या गार्गी महिला कॉलेजमध्ये फेस्टचं आयोजन करण्य़ात आलं होतं. यावेळी झुबिन न्यूतियाल या प्रसिद्ध गायकाचा शो असल्याने सर्वांमध्ये उत्सुकता होती. मात्र या दिवशी त्यांच्यासोबत झालेली वागणूक माणूसकीला काळीमा फासणारी आहे. कॉलेजचे फेस्ट सुरू असताना अचानक गेट तोडून 100 हून अधिक तरुण आत शिरले. गार्गी हे गर्ल्स कॉलेज असल्याने पुरुषाने येथे येण्यापूर्वी पास बनविणे अनिवार्य आहे. मात्र ते तरुण आधार, पॅन आणि मेट्रो कार्ड घेऊन आत आले. यातील अनेकजण Pro-CAA रॅलीतील होते. काहीजण तर ‘जय श्री राम’चा नारा देत होते, अशी माहिती त्या फेस्टमध्ये उपस्थित असलेल्या एका विद्यार्थिनीने दिली. पाहता पाहता ते मुलींच्या घोळक्यात शिरले. ते विद्यार्थिनींवर अश्लिल कमेंट करीत होते. त्यांच्या शरीराला स्पर्श करीत होते. त्यातील काही रिकाम्या स्टॉलच्या टेबलावर उभे राहिले आणि जोरजोराने ओरडू लागले. 'जी मुलगी मला ‘पटेल’ तिला 50 हजारांचं मेकअप किट देईन', असे म्हणताना ते विद्यार्थिनींच्या दिशेने खूण करीत होते. यावेळी CRPF आणि दिल्ली पोलीस कॅम्पनमध्ये तैनात होते. एका विद्यार्थिनीने तिच्यासोबत घडलेला अश्लिल प्रकार सांगितला. एक ग्रुप माझ्या मागे उभा होता. काहींनी आमच्या पार्श्वभागाला स्पर्श केला, आम्ही मागे वळलो तोपर्यंत ते तरुण गर्दीमधून निघून गेले. हे अत्यंत घृणास्पद होतं. या घटनेनंतर आम्ही तेथून निघून गेलो. नंतर आम्हाला कळाले की अशा घटना अनेक मुलींसोबत घडल्या आहेत. काही विद्यार्थिनींनी सांगितले की, ते तरुण कंबरेत हात घातल होते. हा प्रकार सुरू असतानादेखील महाविद्यालयीन कर्मचारी आणि पोलीस मदतीसाठी आले नाहीत. ते म्हणाले की, तुम्हाला खूप असुरक्षित वाटत असेल तर कॉलेजमध्ये का येता, कॉलेज फेस्टला का येता? यावेळी एक तरुण विद्यार्थिनींसमोर हस्तमैथूनही करीत असल्याची धक्कादायब बाब विद्यार्थिनींनी सांगितली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Arvind kejariwal, CM delhi, Delhi university, Gargi

    पुढील बातम्या