डोनाल्ड ट्रम्प यांचा तेलंगणात जबरी फॅन, उभारला 6 फुटांचा पुतळा

डोनाल्ड ट्रम्प यांचा तेलंगणात जबरी फॅन, उभारला 6 फुटांचा पुतळा

ट्रम्प यांच्या पुतळ्याला त्याने दह्या, दुधाने अभिषेक घातला. नारळ फोडून पुजा केली आणि गावभर प्रसादही वाटला.

  • Share this:

हैदराबाद 18 जून :  अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे जगभर जसे टीकाकार आहेत तसेच त्यांचे चाहतेही आहेत. अमेरिकेतही नसेल असा ट्रम्प यांचा एक चाहता 'भक्त' भारतात आहे. तेलंगणातल्या जंगम या गावातला एक शेतकरी त्यांचा निस्सीम चाहता असून त्याने ट्रम्प यांचा सहा फुटांचा पुतळाच त्याच्या गावात उभारलाय आणि त्याचा दुधाने अभिषेकही केला. बुस्सा कृष्णा असं  ट्रम्प याच्या अनोख्या चाहत्याचं नाव आहे. 14 जून हा डोनाल्ड ट्रम्प यांचा वाढदिवस. जगात कुठेच साजरा झाला नसेल असा त्यांचा वाढदिवस साजरा झाला तो तेलंगनात. कृष्णा याने वाढदिवसानिमित्त ट्रम्प यांचा चक्क सहा फुटांचा पुतळा आपल्या घराच्या अंगणात उभारलाय. एखाद्या देवाच्या मुर्तीची जशी स्थापना करतो तशी स्थापना त्याने ट्रम्प यांच्या पुतळ्याची केली.

ट्रम्प यांच्या पुतळ्याला त्याने दह्या, दुधाने अभिषेक घातला. नारळ फोडून पुजा केली आणि गावभर प्रसादही वाटला. गेल्या तीन वर्षांपासून तो ट्रम्प यांच्या भक्तित लीन झालाय. 2017मध्ये तेलंगणातल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियरची अमेरिकेत हत्या झाली होती. त्यावेळी ट्रम्प यांचे लक्ष भारतीयांकडे जावे यासाठी त्याने त्यांच्या फोटोची पूजा करून ध्यान केलं होतं. त्यावेळी तो प्रसिद्ध झाला होता. तेव्हापासून तो ट्रम्प यांच्या भक्तीला लागलाय.

ट्रम्प यांची पूजा प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत नसल्याचंही त्याने स्पष्ट केलं. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांचं महत्त्व ट्रम्प यांना कळावं. भारत आणि अमेरिका यांचे संबंध आणखी दृढ व्हावेत यासाठी ट्रम्प यांची पूजा करत असल्याचंही त्याचं म्हणणं आहे. कृष्णाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून देशभरातून त्याच्याकडे आता विचारणा सुरू झाली असून देशभर दखल घेण्यात येतेय.

First published: June 18, 2019, 9:04 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading