गढवाल, 18 नोव्हेंबर : खरं प्रेम कधीच मरत नाही, ते अमर असतं (Love Is Immortal) असं म्हणतात. काही जणांच्या प्रेमावरून त्याची खात्रीही पटते. आपलं प्रेम दाखवण्यासाठी काही जण कल्पनाशक्ती वापरतात. तेलंगणातले (Telangana) 86 वर्षांचे हनुमंतय्या यांनी तर त्यांच्या पत्नीप्रेमासाठी असं काही केलं आहे, की त्यामुळे संपूर्ण देशभरात त्यांची चर्चा सुरू आहे. हनुमंतय्या हे गोजुलाब्बा गढवाल जिल्ह्याच्या (Gadhwal District) गढवाल शहरातले आहेत. त्यांची पत्नी वारली. अर्थातच त्यांना तिची खूप आठवण येत होती. पण फक्त आठवणींवर जगायचं नाही असं हनुमंतय्या यांनी ठरवलं होतं. त्यांनी पत्नीच्या निधनानंतर तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ तिचा एक पुतळा उभारला...आणि हा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी थोडेथोडके नाही, तर तब्बल सात लाख रुपये खर्च केलेत.
त्यांची पत्नी राजलक्ष्मी यांचं 2019 मध्ये निधन झालं. तिच्या आठवणी कायम राहाव्यात यासाठी राजलक्ष्मीचा पुतळा उभारायचं त्यांनी ठरवलं. हा पुतळा त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीनं त्यांनी त्यांच्या शेतात उभारला आहे. इतकंच नाही तर ते रोज या पुतळ्याची पूजा करतात. त्यांच्या परिसरात असलेल्या मूळच्या आंध्र प्रदेशातल्या एका महिलेनं तिच्या नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर त्याच्या स्मरणार्थ एक मंदिर बांधलं आहे. मूळच्या प्रकाशम इथल्या पद्मावती यांच्या पतीचं अपघातात निधन झालं होतं. अशाच प्रकारे तमिळनाडूतल्या सेथुरमण (Sethuraman) यांनी तर त्यांच्या पत्नीचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर तीस दिवसांत मदुराई इथं त्यांच्या घरात उभारलेला हा सहा फुटी पुतळा सगळीकडेच चर्चेचा विषय आहे.
कर्नाटकातल्या (Karanataka) के. श्रीनिवास गुप्ता या 57 वर्षांच्या उद्योगपतीनं त्याच्या पत्नीचा सिलिकॉनचा हुबेहूब पुतळा उभारला आहे. नवीन घर बांधण्याचं त्या दोघांचं स्वप्नं होतं. नवं घर बांधूनही झालं; पण तिथं येण्यापूर्वीच त्यांच्या पत्नीचं निधन झालं. म्हणून गुप्ता यांनी नव्या घरात हा पुतळा उभारला आहे आणि तिच्या आठवणी जाग्या ठेवल्या आहेत.
“प्रेमाला कोणतंही बंधन नसतं, मर्यादा नसतात. प्रेम व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत निराळी असते. आपली प्रिय व्यक्ती जवळ असताना काही जण ते अगदी सहज व्यक्त करू शकतात, तर काही जणांना मात्र कितीही प्रेम असलं तरी तसं व्यक्त होता येत नाही. आपली प्रिय व्यक्ती जिवंत असताना एखाद्या वेळेस प्रेम व्यक्त होऊ शकलं नाही त्यांच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून काही जण असं करू शकतात,” असं मानसशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही. पट्टभिराम यांनी News18 शी बोलताना सांगितलं.
प्रेमामुळे जगण्याला नवा अर्थ मिळतो. अनेकांच्या तर आयुष्याला कलाटणी मिळते. सुखदु:खात साथ देणारी आपली प्रिय व्यक्ती सोडून गेल्यानंतर तिचा विरह थोडा तरी सुसह्य व्हावा आणि कोणत्या ना कोणत्या रूपात ती व्यक्ती समोर दिसत राहावी यासाठीच ही धडपड असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.