तेलुगू देसम पार्टीचा एनडीएसोबत काडीमोड

आंध्र प्रदेशला विशेष राज्य देण्याच्या मागणीवरून चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

Sachin Salve | Updated On: Mar 7, 2018 11:41 PM IST

तेलुगू देसम पार्टीचा एनडीएसोबत काडीमोड

07 मार्च : आंध्र प्रदेशला विशेष राज्य देण्याच्या मागणीवरून चंद्रबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीने एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. उद्या गुरुवारी टीडीपीचे केंद्रीय मंत्री अशोक गजपती आणि वाईएस चौधरी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणार आहे. अर्थमंत्री अरूण जेटली यांनी आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर चंद्रबाबूंनी आज आपला निर्णय जाहीर केला.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे प्रमुख चंद्रबाबू नायडू यांनी अर्थसंकल्पात आंध्रकडे दुर्लक्ष केल्यामुळे जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मोदी सरकारने 5 वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशच्या विभाजनाच्या वेळी अनेक आश्वासनं दिली होती. पण एकही आश्वासन पूर्ण केलं नाही असा आरोप नायडूंनी केला होता.

त्यामुळेच आता नायडूंनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केलाय.

'मोदींनी आश्वासनं पाळलं नाही'

एनडीएतून वेगळं होण्याचा निर्णय जाहीर करताना चंद्रबाबू नायडूंनी मोदींवर टीका केली. मोदी सरकारने आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा आणि स्पेशल पॅकेज देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्यांनी आश्वासन पाळलं नाही. त्यामुळे टीडीपी एनडीएतून बाहेर पडणार आणि आमचे मंत्री उद्या राजीनामा देतील अशी घोषणा नायडूंनी केली.

काय आहे प्रकरण

भाजप सरकारने दिलेली आश्वासनं न पाळल्यामुळे टीडीपी तीव्र नाराज होती. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी चंद्रबाबू नायडूंनी अनेक वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. पण यावर कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे मागे काही दिवसांपासून टीडीपी एनडीएतून बाहेर पडणार अशी चर्चा होती. पण  अरुण जेटली यांनी मनधरणी केल्यानंतर नायडू यांनी नमतं घेतलं. जेटलींनी टीडीपीला सोबत घेऊन 2019 ची निवडणूक लढवणार असं जाहीर केलं होतं.

मात्र, मंगळवारी अमरावतीमध्ये टीडीपी आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप सरकारसोबत युती तोडण्याची चर्चा झाली. या बैठकीत 125 आमदार सहभागी झाले होते. एवढंच नाहीतर टीडीपीने वेगळं होण्याचा इशाराही एनडीएला दिला होता.

पण अरुण जेटलींनी आंध्राला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिला. उत्तर-पूर्वेकडील राज्यांनाच विशेष राज्याचा दर्जा देता येईल, कारण त्या राज्याकडे तशा सुविधा नाहीत असंही जेटली यांनी स्पष्ट केलं होतं. जेटली यांच्या या विधानानंतर टीडीपीने तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अखेर आज एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 7, 2018 11:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close