तमिळनाडू, 27 ऑक्टोबर : दिवाळीपूर्वी फटाक्यांची पॅकिंग सुरू असतानाच अचानक आग लागून मोठी दुर्घटना घडली आहे. तमिळनाडूतील कालाकुरिची (Kallakurichi Tamil Nadu) येथील शंकरपूरम (Sankarpuram) परिसरात असलेल्या फटाक्यांच्या गोदामाला रात्रीच्या सुमारास भीषण आग (Fire caught in firecracker godown) लागली. ही आग इतकी भीषण होती की, आगीच्या ज्वाळा आणि धूर कित्येक किलोमीटर लांबून दिसत होता. तसेच आगीनंतर फटाक्यांचाही स्फोट होत होता. या दुर्घटनेत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत.
आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या, पोलीस, स्थानिक प्रशासकीय अधिकारी दाखल झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. मृत्यू झालेल्या पाच जणांच्या नातेवाईकांना तमिळनाडू सरकारकडून पाच लाखांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना एक लाख रुपयांची आर्थिक महदत जाहीर करण्यात आली आहे.
#UPDATE | Tamil Nadu: Earlier visuals of the fire incident at a firecracker shop in Sankarapuram town of Kallakurichi district, where five people lost their lives. pic.twitter.com/POoNh4dH19
— ANI (@ANI) October 26, 2021
ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळालेली नाहीये. दिवाळीमुळे या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा स्टॉक ठेवण्यात आला होता. मंगळावारी रात्रीच्या सुमारास गोडाऊनमधून धूर येत असल्याचं दिसून आलं आणि त्यानंतर अवघ्या काही क्षणातच संपूर्ण गोडाऊनला आग लागली. आग लागल्याने फटाक्यांचा आवाज, नागरिकांचा आक्रोश या सर्वांमुळे एकच गोंधळ उडाला होता. फटाक्यांचा एकत्र स्फोट होत असल्याने संपूर्ण परिसर फटाक्यांच्या आवाजाने दणाणून गेला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.
घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेत पाच जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर इतर 9 जण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाच जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला जिल्हाधिकारी पीएन श्रीधर यांनी दुजोरा दिला आहे.
यापूर्वीही आगीच्या घटना
गेल्या काही वर्षांत फटाक्यांच्या दुकानांना, गोदामांना आग लागल्याच्या विविध घटना समोर आल्या आहेत. फटाक्यांच्या दुकानांसोबतच गोडाऊन, फॅक्ट्रीला आग लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. सप्टेंबर महिन्यात विरुद्धनगर जिल्ह्यातील थयालीपट्टी येथील फटाक्यांच्या फॅक्ट्रीला आग लागली होती ज्यात 10 जणांचा मृत्यू झाला होता तर 7 जण जखमी झाले होते.
जून महिन्यात याच परिसरात एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला होता. या स्फोटात दोन जणांनी आपले प्राण गमावले होते. गेल्यावर्षी सप्टेंबर 2020 मध्ये सुद्धा फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली होती आणि त्यावेळी 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Diwali 2021, Fire, Tamil nadu