नवी दिल्ली, 07 डिसेंबर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी होता. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभर बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक नेत्यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी काही पोस्टर्सही लावली होती; मात्र तमिळनाडूतल्या कुंभकोणममधल्या पोस्टरवरून वाद निर्माण झाला. एका तमीळ हिंदुत्ववादी गटाच्या नेत्यानं बाबासाहेबांचं भगव्या पेहरावातलं पोस्टर लावलं. याप्रकरणी मंगळवारी रात्री (6 डिसेंबर) संबंधित नेत्याला अटक करण्यात आली. या पोस्टरमध्ये बाबासाहेबांनी कपाळावर भस्म लावलेलं दिसत असून, भगवे कपडे घातलेले दिसत आहेत. 'इंडिया टुडे'ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
'विदुथलाई चिरुथाईगल काची'चे (व्हीकेसी) नेते आणि खासदार, थोल थिरुमावलावन यांनी या पोस्टरचा फोटो ट्विट केल्यानंतर हे प्रकरण समोर आलं. थिरुमावलावन यांनी या घटनेचा निषेध केला. थिरुमावलावन म्हणाले, "आंबेडकरांनी विष्णू किंवा ब्रह्मदेवाची प्रार्थना करण्यास सतत नकार दिला. त्याच आंबेडकरांच्या फोटोत त्यांना भस्म लावलेलं दाखवण्यात आलं आणि त्यांनी भगवा शर्ट घातल्याचं दाखवण्यात आलं. आंबेडकरांची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा धर्मांधांना ताबडतोब अटक करावी," असं ट्विट थिरुमावलावन यांनी केलं होतं.
हे ही वाचा : 7 वर्षांपासून जिच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत होता ती तरुणी जिवंत सापडली; संपूर्ण सत्य जाणून सगळेच शॉक
पोलिसांनी अटक केलेल्या नेत्याचं नाव गुरुमूर्ती आहे. तो हिंदू मक्कल काची गटाचा कुंभकोणम जिल्हा सचिव आहे. दरम्यान, हिंदू मक्कल काचीच्या एका नेत्यानं सांगितलं की, जनजागृती करण्यासाठी आंबेडकरांना भगव्या पोशाखात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
"आंबेडकर भगव्याचे समर्थक होते. कारण त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता. या धर्माचं प्रतीक भगवं आहे. आंबेडकरांना पेरियारवादी करण्याचा प्रयत्न करणार्या थिरुमावलावन यांच्या विरोधात जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही आंबेडकरांचा भगव्या पोशाखातला फोटो लावला," असं हिंदू मक्कल काचीचे नेते अर्जुन संपत म्हणाले.
हिंदू मक्कल काचीचे कुंभकोणम जिल्हा सचिव गुरुमूर्ती यांना या प्रकरणी अटक करण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा : एकाच मुलीची दोघांशी ओळख, प्रेमाचा त्रिकोण अनं नागपुरात तरुणावर जीवघेणा हल्ला
दरम्यान, बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या राज्यघटनेची निर्मिती करताना धर्मनिरपेक्षता आणि समतेच्या तत्त्वांचा पुरस्कार केला आहे. त्यांनी हिंदू धर्म सोडून शांतताप्रिय बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. अशा विचारांच्या बाबासाहेबांना भगव्या वस्त्रांमध्ये दाखवल्यामुळे त्यांच्या अनुयायांनी नाराजी आणि आश्चर्य व्यक्त केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dr. Babasaheb Ambedkar, Hindu