27 डिसेंबर : कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांना पाकिस्ताननं वाईट वागणूक दिल्यावरून आज लोकसभेत काही वेळ गोंधळ झाला. शिवसेना या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झाली होती. यावर सरकारनं भाष्य करावं, आणि काय कृती करणार ते सांगावं, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसनं केली. यावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उद्या उत्तर देणार आहेत.
एका महिलेला तिचं मंगळसूत्र काढायला सांगणे, आईला मराठीत बोलू न देणे, हे अमानवी आहे,असा आक्षेप सर्वच पक्षांनी घेतला. शेवटी, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उठल्या, आणि मी उद्या यावर सविस्तर उत्तर देईन, असं म्हणाल्या.
पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाच्या इमारतीमधील एका खोलीत झालेली ही भेट म्हणजे एका परीने तोंडदेखला सोपस्कार ठरला. कारण जाधव यांना पत्नी व आईला प्रत्यक्ष भेटू दिले गेले नाही. एका काचेच्या तावदानाआडून इंटरकॉमच्या माध्यमातून त्यांना परस्परांशी संवाद साधता आला. काचेतून ते एकमेकांना पाहू शकत होते. परंतु जाधव यांना ज्या खोलीत बसवले होते ती काचेच्या तावदानाच्या पार्टिशनने सीलबंद केलेली होती. त्यामुळे बोलणे व ऐकणे फक्त इंटरकॉमवरूनच शक्य होते.
बलुचिस्तान प्रांतात गुप्तहेर आणि दहशतवादी हालचाली करण्यावरच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तान सरकारने अटक केली होती. तर त्यांचा या साऱ्याशी काही संबंध नसून ते इराणमध्ये व्यापार करत होते अशी भारताची भूमिका आहे . पाकिस्तानने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या विरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. हा खटला आता आंतरराष्ट्रीय कोर्टात सुरू आहे.