मराठी बातम्या /बातम्या /देश /बुरखा घालून 'स्विगी'ची बॅग खांद्यावर घेऊन चाललेली `ही` महिला कोण?

बुरखा घालून 'स्विगी'ची बॅग खांद्यावर घेऊन चाललेली `ही` महिला कोण?

photo - social media

photo - social media

स्विगीची बॅग खांद्यावर अडकवलेल्या आणि बुरखा परिधान केलेल्या एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Lucknow, India

    लखनऊ, 17 जानेवारी : आर्थिक समस्या असलेल्या व्यक्ती मिळेल ते काम करून कुटुंबाचं पालन पोषण करतात. कोणतंही काम लहान किंवा मोठं नसतं; मात्र त्यातून मिळणारा मोबदला फार मोलाचा असतो. आज गरिबीचा धीराने सामना करणारी लहान मुलं, महिला आणि पुरुष मोलमजुरी करून कुटुंबाचं पालनपोषण करताना दिसतात. सध्या अशाच एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. बुरखा घातलेली ही महिला पाठीवर 'स्विगी'ची बॅग अडकवून रस्त्यावर चालताना दिसत आहे. ही महिला 'स्विगी'त डिलिव्हरीचं काम करते का असा प्रश्न हा फोटो पाहिल्यावर उपस्थित होतो; पण वास्तव निराळं आहे. हे वास्तव नेमकं काय आहे, ते जाणून घेऊ या. `नवभारत टाइम्स`ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.

    आत्मविश्वासाने वाटचाल केली तर यशस्वी होणं फारसं अवघड नसतं,असं म्हणतात. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या महिलेविषयी बोलायचं झालं, तर लखनौमध्ये स्विगीची बॅग खांद्यावर अडकवून रस्त्यावर चालत वस्तूंची डिलिव्हरी करणारी रिझवाना नावाची ही महिला एका गरीब कुटुंबातली आहे. ती सातत्याने आर्थिक समस्यांचा सामना करत आहे. रिझवाना लखनौमधील जगतनारायण रोड चौकातल्या जनता नगरी कॉलनीतल्या एका छोट्याशा घरात तिच्या तीन मुलांसह राहते. घराच्या आर्थिक विवंचनेमुळे रिझवाना पेपर प्लेट विकण्याचं काम करते. याशिवाय काही घरांमध्ये साफसफाईचंदेखील काम करते. सध्या रिझवाना तिची मेहनत आणि आत्मविश्वासामुळे जोरदार चर्चेत आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण तिला आर्थिक मदतही करत आहेत.

    काही दिवसांपूर्वी स्विगीची बॅग खांद्यावर अडकवलेल्या आणि बुरखा परिधान केलेल्या एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. हा फोटो डालीगंज परिसरातल्या नदवा कॉलेजकडे जाणाऱ्या उतारावर एका व्यक्तीने क्लिक केला होता. हा फोटो व्हायरल झाल्यावर ही महिला स्विगीसाठी काम करत असल्याची चर्चा सुरू झाली. या महिलेचा फोटो आणि तिच्या कामाचं जोरदार कौतुक झालं. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर या महिलेचा शोध सुरू झाला. लखनौच्या स्विगी कार्यालयात एनबीटी ऑनलाइनची टीम पडताळणीसाठी पोहोचली; पण ही महिला फूड डिलिव्हरीचं काम करत नाही, असं तिथं सांगण्यात आलं. त्यानंतर शोध घेतला असता, ही महिला अर्थात रिझवाना बुरखा परिधान करून आणि खांद्यावर स्विगीची बॅग अडकवून रस्त्यावर पेपर प्लेट, डिस्पोजेबल ग्लास आणि कप विकत असल्याचं समोर आलं.

    हेही वाचा - Flight Accident : धक्कादायक! विमान प्रवासात 121 जणांचा मृत्यू, काय घडलं होत 18 वर्षांपूर्वी

    याबाबत रिझवानाने सांगितलं, `माझं घर खूप लहान आहे. तिथं मी माझ्या तीन मुलांसह राहते. यापूर्वी तीन वेळा शासकीय घरकुलासाठी अर्ज केला; पण घर मंजूर झालं नाही.` आता तुम्हाला सरकारकडून काही मदत मिळण्याची आशा आहे का, असं विचारल्यावर `अल्लाहची इच्छा असेल तर कदाचित मिळेल,` असं रिझवानानं सांगितलं. `मला यापूर्वी सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही,` असंही तिने स्पष्ट केलं. `माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मी सकाळ-संध्याकाळी काही घरांमध्ये भांडी धुण्याचं आणि साफसफाईचं काम करते. त्यातून मला 1500 रुपये मिळतात. दुपारी बाजारात फिरून तिथल्या छोट्या दुकानांवर, स्टॉलवर डिस्पोजेबल ग्लास आणि कप विक्री करण्याचं काम करते,` असं रिझवानाने सांगितलं.

    `23 वर्षापूर्वी माझं लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांतच मी कामं करण्यास सुरुवात केली. माझ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची आहे. त्यामुळे मला काम करावं लागतं. पूर्वी मी जे काम करत होते. त्यातून पुरेसं उत्पन्न मिळत नव्हतं. त्यामुळे मी पेपर प्लेट, डिस्पोजेबल ग्लास, कप विक्रीचं काम स्वतः सुरू केलं. हे काम आटोपल्यानंतर मी मुलांचा अभ्यास घेते. माझं इयत्ता पाचवीपर्यंत शिक्षण झालं आहे. पती व्यसनी असल्याने तो घरखर्च देत नव्हता. ज्या बॅगसोबत माझा फोटो शेअर होत आहे, ती बॅग मी डालीगंज येथून 50 रुपयांना विकत घेतली आहे. कारण ती मजबूत आहे आणि त्यात सामान घेऊन चालणं सोपं जातं,` असं रिझवानानं सांगितलं. तिचा पती तीन वर्षांपासून बेपत्ता असल्याने घरखर्चाचा सगळा भार तिला स्वतःलाच उचलावा लागतो.

    First published:

    Tags: Social media, Uttar pradesh, Viral, Woman