'Swami Agnivesh यांना यमराजांनी आधीच का नाही नेलं!' - माजी CBI अधिकाऱ्याच्या Tweet वर हंगामा

'Swami Agnivesh यांना यमराजांनी आधीच का नाही नेलं!' - माजी CBI अधिकाऱ्याच्या Tweet वर हंगामा

Swami Agnivesh news : CBI चे हंगामी प्रमुख राहिलेल्या माजी IPS ऑफिसरच्या वाह्यात Tweet वर सोशल मीडियात सडकून टीका झाली. त्यानंतर Twitter नेच हा मजकूर काढून टाकला.

  • Share this:

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर : आर्य समाजाचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं शुक्रवारी दिल्लीत निधन झालं. त्यांच्या मृत्यूच्या बातमीवर विचित्र आणि असंवेदनशील प्रतिक्रिया Twitter वर लिहिल्यानंतर माजी IPS अधिकारी एम. नागेश्वर राव यांच्यावर टीकेची झोड उठली. 'स्वामी अग्निवेश भगवे कपडे घातलेले हिंदूविरोधक होते. त्यांच्यामुळे हिंदुत्त्ववादाचं फार मोठं नुकसान झालं', असं म्हणत 'माझी यमराजांकडे तक्रार आहे, ते एवढे दिवस का थांबले?' अशा अर्थाचं Tweet या नागेश्वर राव यांनी केलं होतं. IPS अधिकारी म्हणून काम केलेल्या राव यांच्याकडे काही काळ CBI चं संचालकपदही होतं.

नागेश्वर राव यांनी स्वामी अग्निवेश यांच्या निधनाच्या बातमीवरच Tweet करत ही मुक्ताफळं उधळली. हंगामी CBI संचालकपद भूषवलेल्या व्यक्तीने या पातळीवर येऊन निवर्तलेल्या व्यक्तीबद्दल बोलावं यावरून सोशल मीडियावर खळबळ उडाली.

स्वामी अग्निवेश तुम्ही तेलुगू ब्राह्मण म्हणून जन्माला आलात याची मला लाज वाटते, असंही नागेश्वर राव यांनी लिहिलं होतं. Twitter ने संध्याकाळी उशिरा हे ट्वीट काढून टाकलं. Twitter च्या धोरणांमध्ये बसत नसल्याने काढून टाकत असल्याचा मेसेज त्यानंतर आला.

स्वामी अग्निवेश यांच्या निधनानंतर अशा असंवेदनशील भाषेत त्यांच्यावर टीका केल्याबद्दल नेटकऱ्यांनी या माजी CBI प्रमुखांवर टीकेची झोड उठवली.

इंडियन पोलिस फाउंडेशनने यावर त्वरित Tweet करत राव यांचा निषेध केला. पोलीस कर्मचारी आणि नागरिक यांच्यात समन्वयाचं काम करणारी ही स्वयंसेवी संस्था आहे. 'स्वतःला IPS म्हणवणाऱ्या या माजी अधिकाऱ्याचा द्वेषमूलक मजकूर निंदनीय आहे. तमाम पोलीसदलासाठी विशेषतः तरुण अधिकाऱ्यांचं मानसिक खच्चीकरण करणारा हा संदेश आहे. राव यांनी पोलिसांच्या खाकी गणवेशाचा अवमान केला आहे', असं  IPF ने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

प्रशांत भूषण यांनीदेखील राव यांच्यावर सडकून टीका केली आहे. अशा माणसाला CBI प्रमुख केला, असं म्हणत त्यांनी सध्याच्या NCB प्रमुखांवरही टीका केली आहे.

Published by: अरुंधती रानडे जोशी
First published: September 12, 2020, 8:23 PM IST

ताज्या बातम्या