नवी दिल्ली 2 जानेवारी : लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहताना जर दोघांनी सहमतीने लैंगिक संबंध ठेवले आणि नंतर पुरूषाने लग्न केले नाही तर तो बलात्कार ठरणार नाही असा महत्त्वाचा निकाल सुप्रीम कोर्टाने बुधवारी दिला.
महाराष्ट्रातल्या एका नर्सने तिच्या सहकारी डॉक्टर विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
नंतर ते प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं. डॉक्टर आणि ती नर्स लिव्ह इन मध्ये राहत होती. पण नंतर डॉक्टरने नर्ससोबत लग्न केलं नाही. नंतर नर्सने पोलिसात डॉक्टरविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
काही कारणांमुळे पुरुषाला लग्न करणं शक्य झालं नाही तर ती त्याची चूक नाही.
काही गोष्टी या त्या माणसाच्याही हातात नसतात. त्यामुळे आधीच्या काळातले लैंगिक संबंध हा बलात्कार होऊ शकत नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. बलात्कार आणि सहमतीचे संबंध यात फरक आहे. मात्र अशा प्रकरणाची योग्य चौकशी झाली पाहिजे.
अशा प्रकरणात त्या पुरुषांचा उद्देश काय होता हे महत्त्वाचं आहे. केवळ आपली वासना शमविण्यासाठी त्याने जर संबंध ठेवले असतील तर ते चूक आहे असंही कोर्टानं आपल्या निकालात म्हटलं आहे.