Contempt of Court: 6 महिने कारावास की दंड? प्रशांत भूषण प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय

Contempt of Court: 6 महिने कारावास की दंड? प्रशांत भूषण प्रकरणी आज सुप्रीम कोर्ट देणार निर्णय

प्रशांत भूषण यांनी न्यायपालिकेबाबत केलेल्या दोन 'ट्वीट'द्वारे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट : सुप्रीम कोर्ट (Supreme Court) आज न्यायालय अवमान प्रकरणी (Contempt of Court) ज्येष्ठ विधिज्ञ व कार्यकर्ते प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांच्या विरुद्ध शिक्षेचा निर्णय घेतील. प्रशांत भूषण यांनी न्यायपालिकेबाबत केलेल्या दोन 'ट्वीट'द्वारे न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्यांना दोषी ठरवले आहे. 14 ऑगस्ट रोजी त्यांनी केलेल्या ट्वीटवरून प्रशांत भूषण यांचे स्पष्टीकरण कोर्टाने फेटाळले आणि त्यांना अवमान केल्याबद्दल दोषी ठरविले. कोर्टाने भूषण यांनी बिनशर्त माफी मागण्यासाठी वेळ दिला होता, परंतु त्यांनी माफी मागण्यास नकार दिला.

न्यायमूर्ती अरुण मिश्रा (Justice Arun Mirhra) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ सकाळी 10.30 च्या सुमारास प्रशांत भूषण यांच्याविरोधात निकाल देतील. न्यायालयीन कायद्याअंतर्गत शिक्षा म्हणून, भूषण यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास किंवा 2000 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ठोठावली जाऊ शकते.

प्रशांत भूषण यांच्या शिक्षेसंदर्भात अॅटर्नी जनरल काय म्हणाले होते?

यापूर्वी, अटर्नी जनरल केके वेणुगोपाल यांनी खंडपीठाला विनंती केली की भूषण यांना दोषी ठरविण्यात आल्याने अवमान प्रकरणात शिक्षा होऊ नये. त्यावर खंडपीठाने म्हटले आहे की, 'प्रशांत भूषण आपल्या ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त न करण्याच्या आपल्या भूमिकेचा पुनर्विचार करेपर्यंत कोर्ट ही विनंती मान्य करू शकत नाही.' खंडपीठाने वेणुगोपाल यांना सांगितले की, भूषण यांच्या विधानाचे स्वर, भावना या प्रकरणाला आणखीन बिघडत आहेत.

का प्रशांत भूषण यांनी माफी मागण्यास दिला नकार?

प्रशांत भूषण यांनी, 'न्यायालय ही संस्था भरकटताना दिसत असेल, तर त्याविरोधात आवाज उठविणे हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे, मी चांगल्या भावनेने मत व्यक्त केले आहे. सुप्रीम कोर्ट किंवा सरन्यायाधीशांच्या अवमानासाठी नाही, असे सांगितले. तसेच, माझे 'ट्वीट' प्रामाणिक विश्वासाचे प्रतिनिधित्व करतात. मी तेच विचार व्यक्त केले आहेत, ज्यावर मी कायम विश्वास ठेवतो. त्यामुळे, मी व्यक्त केलेल्या विचारांबद्दल शर्तीसह किंवा बिनशर्त माफी मागणे दांभिकपणाचे ठरेल, असे सांगत माफी मागण्यास नकार दिला होता.

अनेक वकिलांचं समर्थन

मुख्य म्हणजे, याप्रकरणी देशातील 2400 हून अधिक भारतीय वकिलांनी प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ ऑनलाईन याचिका दाखल केली. तसंच, महाराष्ट्रातून पुण्यातही अनेक वकील प्रशांत भूषण यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेले होते. तर काही ठिकाणी वकिलांनी काळ्या फिती बांधून भूषण यांच्याविरोधातील कारवाईचा निषेध केला.

Published by: Priyanka Gawde
First published: August 31, 2020, 9:21 AM IST

ताज्या बातम्या