ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा आज निकाल; सुप्रीम कोर्ट 10:30 वाजता देणार फैसला

ऐतिहासिक अयोध्या प्रकरणाचा आज निकाल;  सुप्रीम कोर्ट 10:30 वाजता देणार फैसला

अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशभर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून उत्तर प्रदेशात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून देशभरात अलर्ट देण्यात आलाय.

  • Share this:

नवी दिल्ली 9 नोव्हेंबर : सगळ्या देशाचं लक्ष लागलेल्या अयोध्या प्रकरणावर आज शनिवारी (9 नोव्हेंबर) सुप्रीम कोर्ट आपला ऐतिहासिक निकाल देणार आहे. सकाळी 10:30 वाजता प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात होईल. सरन्यायाधीश रंजन गोगोई हे या प्रकरणावर आपला निर्णय देणार आहेत. गोगोई हे 17 नोव्हेंबरला निवृत्त होणार असून त्या आधी या प्रकरणाचा निकाल देणार आहेत. सलग 40 दिवस या प्रकरणावर सुनावणी झाल्यानंतर 16 ऑक्टोबरला सरन्यायाधीशांनी या प्रकरणावरचा निकाल राखीव ठेवला होता. गेली अनेक दशकं देशाचं राजकारण आणि समाजकारण अयोध्या प्रकरणामुळे ढवळून निघालं असून आज या वादग्रस्त प्रकरणाचा निकाल लागणार आहे.

या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखाली पाच ज्येष्ठ न्यायाधीशांचं खंडपीठ तयार करण्यात आलं होतं. या खंडपीढापुढे या प्रकरणाशी संबंधीत सर्व पक्षकारांनी आपला युक्तिवाद केला होता. पुरावे सादर केले होते. त्यानंतर सरन्यायाधीशांनी निकाल राखीव ठेवलाय.

या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु झाल्यानंतर कोर्टानं एक मध्यस्त समिती नेमून त्यांनी कोर्टाबाहेर तोडगा काढावा असं सुचवलं होतं. त्या समितीने या प्रकरणाशी संबंधित असलेल्या सर्वांशी चर्चा करून कोर्टाला गोपनीय अहवाल सादर केला. मध्यस्ती शक्य नसून संबंधीत पक्षांना तोडगा मान्य होत नाही असं या मंडळाने कोर्टाला सांगितल्यानंतर कोर्टाने प्रकरणाची दररोज सुनावणी घेत अंतिम निर्णय देण्याचं जाहीर केलं होतं.

या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशभर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून उत्तर प्रदेशात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसच गृहमंत्रालयाने देशभरात अलर्टही जारी केलाय. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम ठेवावा असं आवाहन सामाजिक नेते आणि सर्वच धर्मांच्या धर्मगुरूंनी केलंय.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 9, 2019, 7:03 AM IST
Tags: Ayodhya

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading