नवी दिल्ली, 18 जून: देशात कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने गुरुवारी भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला स्थगिती दिली. या संदर्भातील एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं महत्त्वपूर्ण निकाल दिला.
कोरोनाच्या संकटात कोर्टानं रथ यात्रेला परवानगी दिली तर भगवान जगन्नाथ आम्हाला क्षमा करणार नाही, अशी टिप्पणी सरन्यायाधिश (CJI)एस.ए. बोबडे यांनी दिली आहे.
हेही वाचा... पुणे-नगर-पुणे प्रवास भोवला! शासनादेश डावलणाऱ्या अधिकारी महिलेला हायवेवर घेतलं ताब्यात
ओडिशामध्ये पुरी येथे येत्या 23 जूनपासून रथयात्रा सुरू होणार होती. तब्बल 20 दिवस हा यात्रोत्सव असतो. मात्र, यंदा कोरोनामुळे रथयात्रा रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. या रथयात्रेत 10 लाख भाविक येतात. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं याचिकेत म्हटलं होतं. यावर सरन्यायाधिश एस.ए. बोबडे म्हणाले, यात्रेत 10 लाख काय 10 हजार भाविकही सहभागी झाले तरी ते धोकादायक आहे.
याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं सांगितलं की, देशावर कोरोना सारख्या महाभयानक साथीच्या रोगाचं संकट आहे. अशा स्थितीत सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता यंदा जगन्नाथ पुरी रथ यात्रेला परवानगी देता येणार नाही. यात्रेला देशभरातून सुमारे 10 लाख भाविक येतात. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यंदा ओडिशात कोणतीही रथ यात्रेचं आयोजन करता येणार नाही असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
हेही वाचा... 'मला माफ कर माझ्या बाळा' सुशांतच्या बहिणीची भावनिक पोस्ट वाचून डोळ्यात येईल पाणी
ओडिशा सरकारने अद्याप घेतला नाही निर्णय...
दरम्यान, देशावर कोरोनाचं संकट आहे. या संकट काळात पुरी येथे भगवान जगन्नाथाची रथयात्रा आयोजित करायची की नाही, याबाबत अद्याप ओडिशा सरकारनं कोणताही निर्णय घेतलेला नाही. ओडिशा विकास परिषद नामक एनजीओने रथयात्रा रद्द करावी, अशी मागणी सुप्रीम कोर्टात केली होती.