BREAKING : मराठा समाजाच्या वैद्यकीय आरक्षणाबाबत 15 जुलैला अंतरिम आदेश - सुप्रीम कोर्ट

BREAKING : मराठा समाजाच्या वैद्यकीय आरक्षणाबाबत 15 जुलैला अंतरिम आदेश -  सुप्रीम कोर्ट

आरक्षणाच्या मुख्य याचिकेसोबत संलग्नित करण्यात आलेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

  • Share this:

नवी दिल्ली, 7 जुलै : मराठा आरक्षणाच्या मुख्य याचिकेसोबत संलग्नित करण्यात आलेली वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेश आरक्षणाच्या मुद्यावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यावेळी वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रम प्रवेशाबाबत अंतिम सुनावणी आगामी बुधवारी म्हणजे 15 जुलै रोजी होणार असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे.

'या काळात तात्काळ तारखेचा आग्रह धरणे योग्य ठरणार नाही. अंतरिम आदेशांवर विचार करण्यासाठी आम्ही या सर्व याचिकांची यादी करू,' असं न्यायमूर्ती राव म्हणाले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे 15 जुलैला कोर्ट काय निर्णय देतं, हे पाहावं लागेल.

गेल्या सुनावणीच्या वेळी सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात मराठा आरक्षणाचा लाभ घेत झालेल्या प्रवेशावर स्थगिती देण्यास नकार दिला होता, अशी माहिती सुप्रीम कोर्टातील वकील सचिन पाटील यांनी दिली होती. सोबतच कोर्टाने मुख्य याचिकेसोबत ही याचिका संलग्नित करण्याचा आदेश दिला होता. त्यामुळे आज सुप्रीम कोर्ट सुनावणी दरम्यान काय नवीन आदेश देतं याची उत्सुकता होती.

मराठा आरक्षण आणि वाटचाल

मराठा आरक्षण वैध ठरवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निकालाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने जुलै 2019 मध्ये नकार दिला होता. न्यायालयाच्या या आदेशामुळे मराठा समाजाला मोठा दिलासा मिळाला असला तरी आरक्षण देण्याचा कायदा 30 नोव्हेंबर 2018 मध्ये लागू झाला असल्याने त्याची अंमलबजावणी पूर्वलक्ष्यी प्रभावाने करता येणार नसल्याचेही सांगितले होते.

गायकवाड समितीचा अहवाल स्वीकारत भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने शैक्षणिक तसेच सरकारी नोकरभरतीमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारचा हा निर्णय योग्य असल्याचा निर्वाळा उच्च न्यायालयाने 27 जून 2019 ला दिला होता. मात्र, 16 टक्के आरक्षणाऐवजी शिक्षण क्षेत्रात 12 टक्के, तर सरकारी नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्यात यावे, असा निकाल उच्च न्यायालयाने दिला होता.

Published by: Akshay Shitole
First published: July 7, 2020, 1:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading