इंदूरच्या ताईंच्या घरी एवढा सन्नाटा का ?

इंदूरच्या ताईंच्या घरी एवढा सन्नाटा का ?

लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यानंतर लोकसभेच्या मावळत्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार, अशी शक्यता आहे. या निवडणुकीत वयोवृद्ध नेत्यांना उमेदवारी न देण्याचं भाजपचं धोरण आहे. सुमित्रा महाजन यांचं वय ७६ वर्षं आहे.

  • Share this:

इंदूर, २६ मार्च : लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्यानंतर लोकसभेच्या मावळत्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचीही राजकीय कारकीर्द संपुष्टात येणार, अशी शक्यता आहे. सुमित्रा महाजन यांचं वय ७६ वर्षं आहे. या निवडणुकीत वयोवृद्ध नेत्यांना उमेदवारी न देण्याचं भाजपचं धोरण आहे. म्हणूनच सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीवर अजूनही विचार सुरू आहे.

याआधी, माझ्याविरुद्ध कुणालाही रिंगणात उतरवून दाखवाच, असं आव्हान सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसला दिलं होतं. इंदूरच्या मतदारसंघातूनच निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. पण आता त्यांच्या उमेदवारीवर निर्णय न झाल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.

सुमित्रा महाजन यांच्या इंदूरच्या घरी नेहमीच कार्यकर्त्यांची वर्दळ असते. पण त्यांच्या उमेदवारीची शक्यता दिसत नाही. त्यामुळे घरची ही कार्यकर्त्यांची वर्दळही कमी झाली आहे. इंदूरच्या ताई अशी सुमित्रा महाजन यांची ओळख. पण आता ताईही वातावरणाचा अंदाज घेत आहेत. त्यामुळे त्यांनी या विषयावर मौन बाळगणंच पसंत केलं आहे.

न्यूज १८ ने जेव्हा त्यांच्याशी याबाबत संपर्क साधला तेव्हा उमेदवारीच्या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला त्यांनी नकार दिला. भाजपने त्यांच्याऐवजी उमेदवाराचा शोधही सुरू केला आहे. लोकसभेच्या उमेदवारीसाठी इंदूरच्या महापौर मालिनी गौड आणि कैलाश विजयवर्गीय यांच्या नावांचा विचार होतोय, अशी सूत्रांची माहिती आहे.

सुमित्रा महाजन यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसनेही भाजपला लक्ष्य केलं आहे. पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान होत नाही, अशी टीका काँग्रेसने केली आहे. सुमित्रा महाजन यांच्या वयाच्या कारणासोबतच त्यांची निष्क्रियता हेही त्यांना उमेदवारी न देण्याचं कारण आहे, असं काँग्रेस नेत्यांनी म्हटलं आहे.

====================================================================================================================================================================

VIDEO: ...आणि सुषमा स्वराज नितीन गडकरींना म्हणाल्या 'विजयी भव'

First published: March 26, 2019, 6:29 PM IST

ताज्या बातम्या