News18 Lokmat

छत्तीसगडमध्ये पोलिसांचे 'आॅपरेशन प्रहार-४' फत्ते, ९ माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात

अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बाराशे जवानांनी राबवलेल्या अभियानात पोलिसांना यश मिळाले

News18 Lokmat | Updated On: Nov 26, 2018 11:22 PM IST

छत्तीसगडमध्ये पोलिसांचे 'आॅपरेशन प्रहार-४' फत्ते, ९ माओवाद्यांचे मृतदेह ताब्यात

महेश तिवारी, प्रतिनिधी


 छत्तीसगड, 26 नोव्हेंबर : सुकमामध्ये आज माओवाद्यांच्या विरोधात राबवलेल्या मोठया अभियानात 9 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश मिळाले. मात्र या कारवाईत 2 जवान शहीद झाले. दरम्यान मृतक माओवाद्यांमध्ये जहाल माओवादी ताटी भीमासह सहा महिलांचा समावेश असून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने बाराशे जवानांनी राबवलेल्या अभियानात पोलिसांना यश मिळाले आहे.


छत्तीसगडचा सुकमा जिल्हा देशात माओवादी कारवायासाठी सर्वाधिक प्रसिद्ध असून भौगोलिक परिस्थितीसह तेवढ्याच्या घनदाट जंगलामुळे हा भाग माओवाद्यासाठी मोठे आश्रयस्थान बनलं आहे. त्यात चिंतागुफा चिंतलनार या भागात माओवाद्यांची सगळयात मजबुत मिलिट्री बटालियन क्र 1 ची सक्रियता असलेल्या भागातल्या परिस्थितीमुळे हा परिसर माओवाद्यांसाठी बालेकिल्ला बनला आहे.

Loading...

अनेकदा सुरक्षा दलांना प्रयत्न करुनही त्या भागात अभियान राबवणे कठीण जाते. येथे माओवाद्यांचा एक मोठा कॅम्पच असल्याची माहिती सुकमाचे पोलीस अधीक्षक अभिषेक मीणा यांना मिळाली. त्यांनी जिल्हा पोलिसांसह सीआरपीएफ तसेच तेलंगणा पोलिसांना सोबत घेऊन एक संयुक्त अभियान त्या भागात राबवले. वेगवेगळी पथके तयार करुन सकाळीच बुर्कापाल किष्टारम चिंतागुफाच्या सीआरपीएफ कॅम्पमधून रवाना करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास या पथकांनी साकरलाच्या जंगलात माओवाद्यांच्या कॅम्पला घेरले तिथे दोन्ही बाजूने गोळीबार सुरू झाला दुपारपर्यंत सुरू असलेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले तर 9 माओवादी ठार झाले.


सुरक्षा दलाच्या गोळीबाराला प्रतिउत्तर देण्यासाठी ही चकमक सुरू असतानाच माओवाद्यांचा दुसरा बॅकअॅप चमूही तिथे पोहचला. मृतक जवानासह माओवाद्याचे मृतदेह अॅम्बुशमधून बाहेर काढत असताना माओवाद्यांकडून हँडग्रेनेडचा मारा सुरू होता. त्या भागात हेलिकॉप्टरही घिरटया घालू लागल्याने माओवाद्यावर दबाव तयार झाला आणि त्यांनी माघार घेतली.


दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश मिळाले. मृतक माओवाद्यांमध्ये दक्षिण बस्तर विभागीय समितीचा सदस्य ताटी भीमाही होता. त्याच्या सोबत ननाटय मंडलीची अध्यक्ष पोडीयम राजेही होती. मृतक माओवादी या भागातल्या नागरीकांना सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून माओवादी चळवळीकडे आकर्षित करण्यात तरबेज होते अशी माहिती छत्तीसगडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.


घटनास्थळाहून एसएलआर रायफलीसह १० बंदुका जप्त करण्यात आल्या आहेत. तब्बल बाराशे जवानांनी मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे या अभियानात यश मिळवले असले तरी दोन जवान या अभियानात गमवावे लागले आहे.

==============================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 26, 2018 11:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...