पाटणा, ११ ऑक्टोबर : आरक्षणाच्या मुद्द्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर विद्यार्थ्यानं चप्पल भिरकावली आहे. पाटण्यातील एका शालेय कार्यक्रमात हा सर्व प्रकार घडला. घटनेनंतर पोलिसांनी चप्पल फेकणाऱ्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे.
पाटणा येथील गांधी मैदानावरील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री नितीश कुमार विद्यार्थ्यांना संबोधित करणार होते. यावेळी उपस्थितांपैकी एका विद्यार्थ्याने आरक्षणाच्या मुद्द्यावरून नितीश कुमारांवर चप्पल भिरकावली. ही चप्पल नितीश कुमारांच्या व्यासपीठावर येऊन पडली. यावेळी व्यासपीठावर नितीश कुमारांसोबत जदयूचे प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंह यांच्यासह इतरही अनेक मोठे नेते उपस्थित होते. चप्पल फेकणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव चंदन असं असल्याचं समजतंय.
चंदनने नितीश कुमारांवर चप्पल भिरकावताच उपस्थित असलेल्या जनता दल युनायटेडच्या कार्यकर्त्यांनी त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, बिहारमध्ये आरक्षण आणि एससी- एसटी अॅक्टमध्ये झालेल्या संशोधनाच्या मुद्द्यावरून अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. मात्र या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केल्याची ही पहिलीच घटना आहे.