नालंदा, 2 फेब्रुवारी : शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षांदरम्यान विचित्र घटना घडल्याचं आपण अनेकदा ऐकतो, वाचतो. विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी करणं, पेपर फुटणं, परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीची तब्येत बिघडणं अशा घटना परीक्षा केंद्रावर घडत असतात. सध्या एक अशीच, पण काहीशी विचित्र घटना जोरदार चर्चेत आहे.
बिहारमधल्या एका परीक्षा केंद्रावर मुलींची गर्दी पाहून एक मुलगा बेशुद्ध पडला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा मुलगा नेमक्या कोणत्या कारणामुळे बेशुद्ध पडला, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असल्याचं दिसून येतं. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.
बिहारमधल्या नालंदामध्ये एक विचित्र घटना घडली. तिथे परीक्षा केंद्रावर सुमारे 500 विद्यार्थिनींना पाहून एक विद्यार्थी बेशुद्ध पडला. इतक्या मुलींना पाहून तो घाबरला आणि नंतर बेशुद्ध पडला, अशी कबुली खुद्द मुलाच्या कुटुंबीयांनी दिली आहे. त्यानंतर त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सोशल मीडियावर या घटनेसंदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. मुलींची गर्दी पाहून हा मुलगा बेशुद्ध कसा पडला असा प्रश्न मनात निर्माण झाला आहे.
इंटरमिजिएट परीक्षेदरम्यान नालंदामध्ये ही विचित्र घटना घडली आहे. बिहार बोर्डाच्या इयत्ता 12वीच्या परीक्षेदरम्यान एक विद्यार्थी परीक्षा हॉलमध्येच बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं. मनीष शंकर असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याचं वय 17 वर्षं आहे. अल्लामा इक्बाल कॉलेजचा विद्यार्थी मनीष शंकर याचं परीक्षा केंद्र सुंदरगडमधल्या ब्रिलियंट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये होतं. हे परीक्षा केंद्र बिहार शरीफमध्ये येतं. गणिताचा पेपर देण्यासाठी तो वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचला होता. मात्र, तो आपल्या जागेवर जाताना बेशुद्ध पडला.
हेही वाचा - 10 वीची विद्यार्थिनी, Online Gameमधून प्रेम, प्रियकराला भेटण्यासाठी आतुर, पोहोचली तब्बल 2400किमी
मनीषच्या एका नातेवाईकाने सांगितलं, की `त्याने परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करताच तिथे फक्त मुलीच असल्याचं त्याने पाहिलं. 500 मुलींमध्ये तो एकटा विद्यार्थी त्या परीक्षा केंद्रावर होता. अशा परिस्थितीत इतक्या मुलींमध्ये एकट्याच मुलाला बसवल्याने अशी घटना घडली आहे. एकाच वेळी इतक्या मुली पाहून माझा भाचा घाबरला,` असं एका महिलेने सांगितलं.
500 विद्यार्थिनींमध्ये मनीष शंकर या विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात एकटंच बसवण्यात आलं. इतक्या मुलींमध्ये बसल्यामुळे तो खूप घाबरला आणि परीक्षा देण्याऐवजी बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला बिहार शरीफ सदर रुग्णालयात तात्काळ दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सोशल मीडियावर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, Student