मुंबई, 1 सप्टेंबर : भारतात (India) दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटना वाढत आहेत. 2021 मध्ये भारतात तब्बल 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या (student) आत्महत्यांचं प्रमाण 4.5 टक्क्यांनी वाढलं आहे. हे आम्ही म्हणत नाही, तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (National Crime Records Bureau) ने नुकताच त्यांचा अहवाल जाहीर केला. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. एनसीआरबीच्या(NCRB) अहवालानुसार देशात 2021 मध्ये सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात (Maharashtra) झाल्या आहेत.
एनसीआरबीच्या ताज्या आकडेवारीवरून असे दिसून आलं आहे की, 2021 मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण 4.5 टक्क्यांनी वाढलं आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास, 2021 मध्ये आत्महत्येमुळे 1834 मृत्यू झाले असून, यामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण लक्षणीय आहे. यानंतर मध्य प्रदेशचा नंबर लागतो, या राज्यात 1308 मृत्यू झाले, आणि त्यानंतर तमिळनाडूमध्ये 1246 मृत्यू झाले. एनसीआरबीचा भारतातील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या (ADSI) अहवाल 2021 स्पष्ट केलं आहे की, 2020 आणि 2021 मध्ये कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पदवीधरांची संख्या कमी
अहवालात असंही दिसून आलं आहे की, एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येमध्ये मुलींनी केलेल्या आत्महत्येचे प्रमाण पाच वर्षांतील नीचांकी 43.49 टक्के होतं. तर मुलांच्या आत्महत्येचं प्रमाण 56.51 टक्के होतं. 2017 मध्ये 4711 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर 2021 मध्ये अशा मृत्यूंची संख्या 5,693 झाली. या अहवालात आत्महत्याग्रस्तांची शैक्षणिक स्थिती दर्शविली असून एकूण आत्महत्याग्रस्तांपैकी फक्त 4.6 टक्के पदवीधर किंवा त्यापेक्षा जास्त शिकलेले होते. तर, सुमारे 11 टक्के अशिक्षित होते, व 15.8 टक्के लोकांनी केवळ प्राथमिक स्तरापर्यंतच शिक्षण घेतले होते.
हेही वाचा-कृषिमंत्री सत्तार शेतकऱ्याच्या घरी झोपले, अन् 6 ते 7 किमी अंतरावरच शेतकऱ्याने आयुष्य संपवले!
कौटुंबिक समस्येमुळे उचललं आत्महत्येचं पाऊल
18 वर्षांखालील 10,732 जणांनी आत्महत्येमुळे आपला जीव गमावला असून त्यापैकी 864 जणांनी परीक्षेत नापास झाल्यामुळे हे पाऊल उचललं. एनसीआरबीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. तर, 18 वर्षांखालील वयोगटातील आत्महत्येचं सर्वांत मोठं कारण 'कौटुंबिक समस्या' हे असल्याचंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 2017 पासून विद्यार्थी आत्महत्येचं प्रमाण 32.15 टक्क्यांनी वाढलं आहे. 2017 मध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची संख्या 9,905 होती.
दरम्यान, गेल्या पाच वर्षांत आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. 2020 मध्ये 12,526 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या, तर 2021 मध्ये ही संख्या 13,089 झाली. 2017 आणि 2019 या कालावधीत देशातील एकूण आत्महत्यांपैकी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अनुक्रमे 7.40 ते 7.60 टक्के होतं. 2020 मध्ये ते 8.20 टक्क्यांपर्यंत वाढलं आणि 2021 मध्ये त्यात थोडीशी घसरण झाली असली तरी ते 8 टक्क्यांवर आहे.
विद्यार्थ्यांचे आत्महत्यांचं प्रमाण वाढणं, ही मात्र देशासाठी चिंतेची गोष्ट आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी सर्वच स्तरांतून वेळीच पाऊलं उचलण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra News