कानपूर 8 मार्च : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार सभांना सुरूवात केलीय. शुक्रवारी कानपूर इथं झालेल्या प्रचार सभेत त्यांनी विरोधी पक्ष आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. आज सर्व जग पाकिस्तानवर दबाव टाकत असताना भारतातल्या काही लोकांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला मदत होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय.
पंतप्रधान म्हणाले, भारतीय हवाई दलाने शौर्य दाखवून भारताची शक्ती दाखवून दिली. सर्व देशाने त्यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र काही पक्ष हवाई दलाच्या शौर्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. त्यांना केवळ राजकारण करायचं आहे. अशा लोकांपासून सावध राहा असंही ते म्हणाले.
लखनऊत झालेल्या एका काश्मिरी नागरिकांवर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत त्यांनी असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असं सांगितलं. काही माथेफिरूंनी काश्मिरी नागरिकावर हल्ला केला. हे अतिशय निंदनिय कृत्य आहे. नागरिकांनी अशा घटनांना थारा देऊ नये. उत्तर प्रदेश सरकारने अशा लोकांवर कडक कारवाई केली आहे असंही त्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं. काशीच्या विश्वनाथ मंदिर परिसराचा कायापालट करणाऱ्या एका प्रकल्पाचही भूमिपूजन पंतप्रधानांनी यावेळी केलं. या प्रकल्पात मंदिर परिसराची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीचा आचारसंहित केव्हाही लागण्याची शक्यता असल्याने केंद्र सरकारने भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका सुरू केला आहे. या आधीच्या अखिलेश यादव यांच्या सरकारने सहकार्य केलं असतं तर आत्तापर्यंत या प्रकल्पाचं उद्घाटन झालं असतं असं पतप्रधान म्हणाले.
या प्रकल्पात अधिकारीही अतिशय चांगलं काम करत असल्याचं कौतुकही त्यांनी केलं.