बॉम्बस्फोटाच्या कटाची माहिती असूनही पोलीस निष्क्रीय; श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा गौप्यस्फोट

बॉम्बस्फोटाच्या कटाची माहिती असूनही पोलीस निष्क्रीय; श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा गौप्यस्फोट

श्रीलंकेतली कट्टर मुस्लिम संघटना असलेल्या नॅशनल थोहीथ जमात (एनटीजे) या संघटनेने हे स्फोट घडवले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

कोलंबो, 21 एप्रिल: श्रीलंकेची राजधानी कोलंबोसह देशातील अनेक ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाने श्रीलंका रविवारी हादरून गेलं. अशा प्रकारचे आत्मघाती हल्ले होऊ शकतात अशी माहिती पोलिसांना होती मात्र त्यांनी कुठलीही उपाययोजना केली नाही असा गौप्यस्फोट श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंगे यांनी केला आहे.

विक्रमसिंगे म्हणाले, श्रीलंकेचे पोलीस प्रमुख पुजुथ जयासुंदरा यांनी आठवडापूर्वी सतर्कतेचा इशारा दिला होता. मात्र कुठलीही खबरदारी घेतली नाही. चर्चेसवर हल्ला होऊ शकतो अशी माहिती होती. मात्र ही माहिती वरपर्यंत दिली गेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.

श्रीलंकेच्या मंत्रिमंडळालाही ही माहिती देण्यात येईल असंही ते म्हणाले. या घटनेच्या मागे कोण आहेत त्यांना पकडणं आणि अशा घटना पुन्हा घडू नये याची उपययोजना करणं याला सर्वात जास्त प्राथमिकता आहे असंही त्यांनी सांगितलं.

श्रीलंकेतली कट्टर मुस्लिम संघटना असलेल्या नॅशनल थोहीथ जमात (एनटीजे) या संघटनेने हे स्फोट घडवले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी याच संघटनेने बुध्दाच्या मूर्ती फोडल्याने श्रीलंकेत तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर ही संघटना प्रकाशझोतात आली होती.

मृतांची संख्या 215 वर, तीन भारतीयांचा समावेश

श्रीलंकेतल्या मृतांची संख्या 215 वर गेली आहे तर 450 जण जखमी आहेत. श्रीलंकेतल्या सुरक्षा संस्थांनी आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. मृतांमध्ये तीन भारतीयांचा समावेश असल्याची माहितीही आता पुढे आली आहे. त्यातल्या एका महिलेचं नाव लक्ष्मी असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर दिली आहे.

गेल्या काही तासांमध्ये झालेल्या या बॉम्ब स्फोटांनी संपूर्ण देश हादरला आहे. आतापर्यंत श्रीलंकेत 8 बॉम्बस्फोट झाले असून त्यातले सहा आत्मघाती होते अशी माहिती सुरक्षा दलांनी दिली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीलंकेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

कोलंबो शहरात दुपारी झालेल्या शेवटच्या बॉम्बस्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एपी या वृत्तसंस्थेने दिले आहेत. दरम्यान, या स्फोटांमध्ये मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मृतांमध्ये 35 परदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे समजते. संचारबंदी लागू केल्यानंतर आता सोशल मीडियावरही बंदी घालण्या आली आहे. 22 आणि 23 एप्रिलला सरकारने सुटीही जाहीर केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sri lanka
First Published: Apr 21, 2019 11:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading