नवी दिल्ली, 3 जून : 2021 या वर्षात एकूण चार ग्रहणं घडणार असून, त्यापैकी दोन चंद्रग्रहणं, तर दोन सूर्यग्रहणं असतील. त्यापैकी नुकत्याच झालेल्या वैशाख पौर्णिमेला (26 मे) चंद्रग्रहण झालं, तर 10 जून रोजी वैशाख अमावास्येला सूर्यग्रहण आहे. नुकतंच झालेलं चंद्रग्रहण भारतात अगदी थोड्या भागांचा अपवाद वगळता दिसलंच नाही. कारण भारतात चंद्र उगवायची वेळ होईपर्यंत चंद्र पृथ्वीच्या सावलीतून जवळपास बाहेर पडला होता. त्यामुळे भारतात काही भागांत उपच्छाया ग्रहण अनुभवता आलं. 10 जून रोजी 2021 या वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण होणार आहे. भारतात अरुणाचल प्रदेश आणि लडाखचा काही भाग वगळता हे सूर्यग्रहण (Solar Eclipse) दिसणार नाही. या वेळच्या सूर्यग्रहणावेळी कंकणाकृती ग्रहणाचा आविष्कार जगभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळेल.
'आज तक'ने दिलेल्या वृत्तानुसार, 10 जूनचं सूर्यग्रहण भारतात बहुतांश ठिकाणी दिसणारच नसल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार पाळले जाणारे ग्रहणाबद्दलचे नियम पाळण्याची काही गरज नसल्याचा निर्वाळा ज्योतिषतज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे वटसावित्री आणि शनि जयंती साजरी करण्यावर काहीही बंधन नाहीत, मात्र 15 दिवसांच्या आत दोन ग्रहणं होणार असल्यामुळे निसर्गावर मोठे परिणाम होण्याची शक्यता ज्योतिषतज्ज्ञांनी वर्तवली आहे.
10 जून रोजी ग्रीनलँड, ईशान्य कॅनडा, उत्तर ध्रुव, रशियाचा काही भाग या ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहण (Annular Solar Eclipse) पाहता येणार आहे. युरोप, उत्तर अमेरिका, आशिया, आर्क्टिक आणि अटलांटिक क्षेत्रांमध्ये खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. भारतात अरुणाचल प्रदेश आणि लडाखचा काही भाग वगळता सूर्यग्रहण दिसणारच नाही. दुपारी 1 वाजून 42 मिनिटांनी सुरू होऊन सायंकाळी 6 वाजून 41 मिनिटांनी ते संपेल.
15 दिवसांत दोन ग्रहणं होणं हे ज्योतिषशास्त्राच्या (Astrology) दृष्टीने अशुभ मानलं जातं. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती घडू शकतात. तसंच वेगवेगळ्या राशींच्या व्यक्तींवर त्याचे वेगवेगळे शुभ-अशुभ परिणाम होऊ शकतात.
या सूर्यग्रहणाचा परिणाम वृषभ रास आणि मृग नक्षत्रावर सर्वांत जास्त दिसेल, असं ज्योतिषतज्ज्ञांना वाटतं.
सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येऊन त्यांच्या मध्ये चंद्र आला, की सूर्यग्रहण होतं. चंद्राचा आकार सूर्यापेक्षा खूपच लहान असला, तरी सूर्य चंद्राच्या तुलनेत पृथ्वीपासून खूप लांब अंतरावर आहे. त्यामुळे पृथ्वीवरून ते सारख्या आकाराचे दिसतात. चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाला पूर्ण झाकतं, तेव्हा खग्रास सूर्यग्रहण होतं. चंद्रबिंब जेव्हा सूर्याचा काही भाग झाकतं, तेव्हा त्याला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात. चंद्रबिंब जेव्हा सूर्यबिंबाच्या मधोमध येतं आणि त्याच्या बाजूने सूर्यप्रकाशाची कडा दिसते, तेव्हा ते एखाद्या बांगडीसारखं दिसतं. म्हणूनच त्याला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांमधलं अंतर किती आहे यांवर आणि आपण पृथ्वीवर कोठे आहोत, यावर आपल्याला कोणत्या प्रकारचं ग्रहण दिसणार हे अवलंबून असतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.