भाजपचं सोशल इंजिनीअरिंग, 500 ख्रिश्चन आणि 100 मुस्लीम कार्यकर्त्यांना उमेदवारी, अमित शहा करणार प्रचार

भाजपचं सोशल इंजिनीअरिंग, 500 ख्रिश्चन आणि 100 मुस्लीम कार्यकर्त्यांना उमेदवारी, अमित शहा करणार प्रचार

या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा त्या राज्यात जाणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 02 डिसेंबर: पूर्वेतल्या राज्यांमध्ये धडक दिल्यानंतर डाव्यांचा गड समजल्या जाणाऱ्या केरळमध्ये भाजपने आता जोर लावला आहे. केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली असून मोठ्या प्रमाणावर मुस्लीम आणि ख्रिश्चन उमेदवारांना तिकिटं दिली आहे. भाजपचा हा सोशल इंजिनीअरिंगचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे. 8, 10 आणि 14 डिसेंबरला ही निवडणूक होणार आहे.

केरळमधली पकड मजबुत करण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे. त्यानुसार 100 मुस्लीम आणि तब्बल 500 ख्रिश्चन कार्यकर्त्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. भाजपची जी प्रतिमा निर्माण झालेली आहे त्याच्या नेमके उलट हा निर्णय असल्याचं मत व्यक्त केलं जात आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे सुद्धा केरळमध्ये येणार आहेत.

मात्र वास्तव आणि प्रतिमा वेगळी असल्याचं मत भाजपच्या नेत्यांनी व्यक्त केलंय. पूर्वेतल्या ख्रिश्चन बहुल राज्यांमध्येही भाजपने आता आपली पकड मजबुत केली असून सात पैकी बहुसंख्य राज्यांमध्ये भाजपचीच सत्ता आहे. कधी काळी ही राज्य काँग्रेसचा गढ समजली जात असे. मात्र भाजपने आपल्या प्रतिमेला छेद देत तिथेही पाय रोवले आहेत. तसाच प्रयोग आता केरळमध्येही करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गोव्यातही भाजपने काही प्रमाणात हा प्रयोग यशस्वी केला होता.

केरळमध्ये गेली अनेक दशकं हे काँग्रेस आणि डाव्याचं प्राबल्य राहिलेलं आहे. या राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कामही जोरात सुरू असतं. पश्चिम बंगाल सारखेच केरळमध्येही कार्याकर्त्यांच्या हत्यांचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे केरळमधल्या राजकीय घडामोडींकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं असतं.

Published by: Ajay Kautikwar
First published: December 2, 2020, 6:42 PM IST
Tags: Amit Shah

ताज्या बातम्या