शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी - CSIR

शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोरोना संक्रमणाचा धोका कमी - CSIR

जवळपास 40 संस्थांनी केलेल्या पॅन-इंडिया सर्व्हेनुसार, शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी : संपूर्ण जगावर संकट असलेल्या कोरोना महामारीवर लस शोधण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर संशोधन सुरू आहे. त्यासाठी जगभरातील देशांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या संस्थांमार्फत सर्वेक्षण देखील केले जात आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या माध्यमातून (Council of Scientific and Industrial Research) जवळपास 40 संस्थांनी केलेल्या पॅन-इंडिया सर्व्हेनुसार, शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्या लोकांना कोरोनाचा धोका कमी असल्याची माहिती समोर आली आहे.

या संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये शाकाहारी आणि धुम्रपान करणाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोका कमी असल्याचे आढळून आले. इतकेच नाही तर या सर्वेक्षणात असेही आढळले आहे की, O रक्तगट असलेल्या लोकांना संक्रमणाचा धोका कमी असू शकतो, तर B आणि AB रक्तगटातील लोकांना कोरोनाचा धोका जास्त असू शकतो.' सीएसआयआरने या सर्वेक्षणात 10 हजार 427 वयोवृध्द व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे स्वैच्छिक पद्धतीने नमूने घेऊन अभ्यास केला आहे.

सीएसआयआर-इंस्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB) यांनी केलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, '1 हजार 058 म्हणजेच 10.14 टक्के लोकांमध्ये कोरोना विषाणूसाठी अँटीबॉडी असल्याचे आढळून आले. आयजीआयबीचे ज्येष्ठ वैज्ञानिक आणि अभ्यासाचे सह-लेखक शंतनू सेनगुप्ता यांनी सांगितले की, 'नमुन्यांमधील 346 सीरो पॉझिटिव्ह व्यक्तींची तीन महिन्यांनंतर केल्या गेलेल्या चाचणीतून हे समजले की त्यांच्यामध्ये कोरोना विषाणू प्रति अँटीबॉडी स्तर 'स्थिर' पेक्षा जास्त होता.'

शंतनू सेनगुप्ता यांनी पुढे असं देखील सांगितले की, '35 व्यक्तींचे सहा महिन्यात पुन्हा नमुने घेतले गेले. यामध्ये त्यांच्या अँटीबॉडीच्या स्तरामध्ये तीन महिन्यांच्या तुलनेच घसरण पहायला मिळाली. तर कोणाताही परिणाम नसणाऱ्या अँटीबॉडीचा स्तर स्थिर असल्याचे आढळून आले. तसंच, सामान्य अँटीबॉडीच्या स्तरामध्ये कोणताही परिणाम न होणाऱ्या अँटीबॉडीचा स्तर गरजेपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले.'

सर्वेक्षणामध्ये असे देखील सांगण्यात आले आहे की, 'धुम्रपान करणाऱ्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह होण्याची शक्यता कमी असल्याचे आढळून आले आहे. कोरोना रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास होत असल्याची लक्षणं आढळून आली आहेत अशामध्ये धुम्रपान करणे संरक्षणात्मक असू शकते. या अभ्यासामध्ये फ्रान्समधील दोन अभ्यास, इटली, न्यूयॉर्क आणि चीनमधील याच पद्धतीच्या दोन अभ्यासांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यामध्ये धुम्रपान करण्यांमध्ये संक्रमणाचे प्रमाण कमी असल्याचे नोंदवण्यात आलं आहे.

दरम्यान, गेल्या वर्षी जुलैमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) सांगितलं होतं की, 'धुम्रपान करणाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. कारण धुम्रपान करणाऱ्यांना हातामार्फत तोंडावाटे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. आरोग्य मंत्रालयाने सूचना दिल्या होत्या की, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन केल्यामुळे श्वसनाच्या संसर्गाची तीव्रता वाढू शकते. या लोकांना कोरोनाची लागण होण्याची सर्वात जास्त शक्यता असते. तसंच त्यांचा कोरोनामुळे मृत्यू देखील होऊ शकतो.'

Published by: Akshay Shitole
First published: January 19, 2021, 8:50 AM IST

ताज्या बातम्या