इटानगर, 13 मार्च : भारतासारख्या खंडप्राय देशात मतदान यंत्रणा पोहोचवताना निवडणूक आयोगाची कसोटीच लागते पण तरीसुद्धा अगदी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचण्याचा आयोगाचा प्रयत्न असतो.
भारतातलं एक राज्य असं आहे की ज्या राज्यातल्या एका मतदान केंद्रात फक्त एकच मतदार आहे. हे राज्य आहे डोंगराळ भागात वसलेलं अरुणाचल.अरुणाचल प्रदेशमध्ये लोकसभेबरोबरच विधानसभेचीही निवडणूक आहे.
इथल्या ह्यूलियांग मतदारसंघात मालोगान केंद्रामध्ये एकच मतदार मतदान करण्यासाठी येत असतात. पण त्यांना मतदान करता यावं म्हणून निवडणूक यंत्रणा त्यांच्यापर्यंतही जाऊन पोहोचली आहे.
याच मालोगान मतदान केंद्रावर मागच्या निवडणुकीत 2 मतदारांनी मतदान केलं होतं. पण प्रत्येक मत किंमती असल्यामुळे यावेळी एका मतदारासाठीही मतदानाची व्यवस्था केली जाणार आहे.
अरुणाचल प्रदेशमध्ये 11 एप्रिलला लोकसभा आणि विधानसभेसाठी मतदान होतंय. पूर्ण राज्यात एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे.
अरुणाचलसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम,ओडिशा इथेही विधानसभा निवडणुका होतायत. पण एका मतदान केंद्रावर एकच मतदार हे फक्त अरुणाचलमध्येच पाहायला मिळतंय.
अरुणाचल प्रदेशमधल्या पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या 33 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे 2016 मध्ये इथे भाजप सत्तेत आलं. या राज्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे.
या विधेयकानुसार इथे बेकायदेशीररित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना बाहेर काढलं जाणार नाही किंवा तुरुंगातही डांबलं जाणार नाही. यावरून सत्ताधारी भाजपला विरोधाचा सामना करावा लागतोय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अरुणाचलमध्ये 4 हजार कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ केला आहे. भाजप सत्तेत आल्यापासून अरुणाचलचा चांगला विकास झाला, असा दावाही त्यांनी केला.
या राज्यात 2017 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपची सरशी झाली होती. त्याआधी 2014 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं होतं. पण बंडखोर उमेदवारांमुळे हे सरकार पडलं आणि त्यानंतर 2016 मध्ये भाजपचं सरकार स्थापन झालं.
=============================================================================