नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : सध्या दिल्लीतील 'श्याम रसोई' एका खास कारणामुळे चर्चेत आहे. अतिशय कमी दराने जेवण देत असल्याने दिल्लीतील लोकांमध्ये 'श्याम रसोई'ची चर्चा आहे. केवळ 1 रुपयात जेवण देण्याच्या त्यांच्या कल्पनेमुळे ते लोकप्रिय झाले असून शेकडो लोक नांगोलाईच्या 'श्याम रासोई'मध्ये सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत 1 रुपयांत जेवण्यासाठी येतात.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, प्रवीण कुमार गोयल हे गेल्या 2 महिन्यांपासून इतक्या कमी किंमतीत दररोज सुमारे 1000 ते 1100 लोकांना जेवण देतात. त्याशिवाय दिल्लीतील इंद्रलोक आणि साई मंदिर जवळपासच्या भागात सुमारे 1000 जेवणाचे पार्सलही दिले जातात.
'श्याम रसोई'चं वैशिष्ट्य म्हणजे, ते कोणाकडून पैसे घेत नाहीत. मात्र, डिजिटल पेमेंटद्वारे देणगी स्वीकारली जाते. गोयल यांनी एएनआयला सांगितलं की, आम्हाला लोकांकडून देणग्या मिळतात. काही जण रेशनही देतात. गेल्या दोन महिन्यांपासून आम्ही ही 1 रुपयांत जेवणाची थाळी देत आहोत. लोक डिजिटल पेमेंटद्वारे मदत करतात. सध्या आमच्याकडे आणखी सात दिवस ही सेवा देण्याची क्षमता असल्याचं ते म्हणाले. तसंच ही सेवा अशीच पुढे चालण्यासाठी लोकांना त्यांनी, रेशन देण्यासाठी मदत करण्याचं, आवाहन केलं आहे.
Delhi: 'Shyam Rasoi', near Shiv Mandir in Nangloi is serving food to people at Re 1.
Praveen Goyal, owner says "People donate in kind & help financially. Earlier the cost of food was Rs 10, but we reduced it to Re 1 to attract more people. At least 1,000 ppl eat here each day." pic.twitter.com/QKJ3htAsQN
— ANI (@ANI) October 11, 2020
(वाचा - नोकरदारांसाठी खूशखबर, 5000 होऊ शकते EPS पेन्शन)
गोयल यांनी सांगितलं की, त्यांच्या हॉटेलमध्ये सहा मदतनीस आहेत. ज्यांना ते विक्रीनुसार 300 ते 400 रुपये देतात. एरवी येथे स्थानिक आणि कॉलेजचे विद्यार्थीदेखील त्यांच्या मदतीला येतात. याआधी ही जेवणाची थाळी दहा रुपयांत दिली जात होती. पण, गेल्या दोन महिन्यांपासून जास्तीत जास्त लोकांना आकर्षित करण्यासाठी किंमत कमी करण्यात आली. येथे लोकांना दिल्या जाणाऱ्या अन्नाची गुणवत्ता किंमतीवर अवलंबून नसल्याचंही ते म्हणाले.
गेल्या चार दिवसांपासून 'श्याम रसोई' येथे जेवणाऱ्या नरेन्द्रलाल शर्मा या नियमित ग्राहकाने सांगितलं की, इथल्या जेवणाची चव अतिशय चांगली आहे. येथे सकाळी चहा सुद्धा 1 रुपयात मिळतो.
'श्याम रसोई'ची ही सेवा अशीच अखंडित सुरु राहण्यासाठी प्रवीण कुमार गोयल हे अनेक प्रयत्न करत आहेत. त्यांना या कामात अनेक दानशुरांची साथदेखील मिळत आहे.