शहीद जवानांच्या मदतीच्या घोषणा 'हवेत' नको प्रत्यक्षात आणा - संजय राऊत

शहीद जवानांच्या मदतीच्या घोषणा 'हवेत' नको प्रत्यक्षात आणा - संजय राऊत

'शहीद झालेल्या जवानांची कुटुंबे उघडय़ावर पडतात व मदतीच्या घोषणा हवेत विरतात. तसं होऊ नये.'

  • Share this:

मुंबई 24 फेब्रुवारी :  पुलमावा हल्ल्यानंतर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी देशभरातून हात पुढे आले. अनेक सरकार आणि संस्थांनी अनेक घोषणा केल्या. पण या सर्व घोषणा या प्रत्यक्षात याव्यात त्या घोषणाच ठरू नयेत असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. 'सामना'च्या रविवारच्या 'उत्सव' पुरवणीत त्यांनी एक लेख लिहून यावर आपली भूमिका स्पष्ट केली.

काय आहे लेखात?

पुलवामा हल्ल्यानंतर देशभक्तीची लाट उसळली. दहशतवादी हल्ला, युद्ध व दंगली झाल्याशिवाय अशी लाट का उसळू नये? 40 जवान शहीद झाले, पण गेल्या चार वर्षांत सीमेवर आमचे जवान सातत्याने प्राण गमावीत आहेत. त्यांची कुटुंबे उघडय़ावर पडतात व मदतीच्या घोषणा हवेत विरतात. तुम्हाला तो हेमराज आठवतोय का?

पुलवामातील हल्ल्यानंतर देशात राष्ट्र ‘भावना’ उचंबळून आल्या. हे नेहमीच घडते. वीर जवानांची चिंता सगळय़ांनाच आहे. मदतीचा ‘ओघ’ सुरू असतो. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सचिन तेंडुलकर असे ‘सेलिब्रिटीज’ वीर जवानांसाठी मोठय़ा रकमांची मदत करतात. त्यांचे कौतुक होते. 2013 साली कश्मीर सीमेवर हेमराज हा जवान शहीद झाला. त्याला पाक रेंजर्सनी निर्घृणपणे मारले. त्यानंतर हेमराजच्या कुटुंबास 25 लाख रुपयांची मदत जाहीर केली गेली, पण ही संपूर्ण रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना आजपर्यंत मिळालेली नाही. एक घर सरकारने दिले ते रिकामे करण्यासाठी आता नोटीस आली आहे.

हेमराजच्या पत्नीस पेट्रोल पंप आणि सरकारी नोकरी देण्याचा वायदा केला होता. त्यातले काहीच पूर्ण झाले नाही. हेमराजची पत्नी तिच्या तीन मुलांसह सरकारदरबारी उंबरठे झिजवत आहे. निराशेशिवाय तिच्या पदरी काहीच पडत नाही. पुलवामा हल्ल्यानंतर जसा देशभक्तीचा माहोल निर्माण झाला आहे तसाच माहोल हेमराजच्या बलिदानानंतरही निर्माण झाला होता. बदल्याच्या आरोळय़ा ठोकल्या जात होत्या. आता पुन्हा चाळीस ‘हेमराज’ व त्यांची कुटुंबे तोच आक्रोश करीत आहेत.

सैन्य पोटावर चालते

पुलवामा हल्ल्यात हुतात्मा झालेले चाळीस जवान हे सामान्य कुटुंबातले आहेत. सैन्य पोटावर चालते व चालत राहणार हे निर्विवाद सत्य कुणीही नाकारणार नाही. त्या सैनिकांची दुःखेही इतरांसारखीच आहेत. पुलवामातील शहीद अजित कुमार आजाद हा उत्तर प्रदेशातील उन्नावचा. त्याला दोन लहान मुली आहेत. ईशा वय 8 आणि श्रेया वय 6. दोन्ही मुलींना डॉक्टर व्हायचे होते.

10 फेब्रुवारीस अजित कुमारची सुट्टी संपली व तो जम्मूस निघाला. त्याने दोन्ही मुलींना जवळ घेतले व सांगितले, ‘‘मन लावून अभ्यास करा.’’ अजित कुमार आपल्या मुलींना आता कधीच भेटू शकणार नाही. अजित कुमारच्या अंतिम यात्रेची छायाचित्रे प्रसिद्ध झाली. त्यात स्थानिक खासदार साक्षी महाराज व आमदार पंकज गुप्ता यांच्या चेहऱयावरील हास्य संताप आणणारे आहे.

First published: February 24, 2019, 5:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading