प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 19 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या सत्ता स्थापनेची कोंडी फोडण्यासाठी आता शिवसेनेने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती पुढे आलीय. आज होणारी काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या नेत्यांची बैठक आता बुधवारी नवी दिल्लीत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राऊतांचं पवारांना भेटणं हे महत्वाचं मानलं जातंय. राऊतांनी सलग दुसऱ्या दिवशी पवारांची भेट घेऊन चर्चा केलीय. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह काही नेते हे दिल्लीत दाखल झाले असून ते बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेने आपल्या आमदारांना मुंबईत येण्यास सांगितलं असून शुक्रवारी उद्धव ठाकरे सर्व आमदारांशी बोलणार आहेत.
राज्यात सत्तास्थापनेसाठी विलंब होत असल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झालीय. फक्त आमदारच नाही तर कार्यकर्तेही संभ्रमावस्थेत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असल्याने शिवसेनेची चिंता वाढली आहे. भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादीच्या माध्यमातून काँग्रेसची चर्चा सुरू केली. या जुळवाजुळवीलाही आता अनेक दिवस होत असल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचं उद्धव ठाकरे यांचं स्वप्न केव्हा पूर्ण होणार असा प्रश्न आता सेनेतूनच विचारला जातोय. दररोज फक्त बैठका होत असल्याने त्यातून काहीही निघत नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर हाता तोंडाशी आलेला घास जातोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे उद्धव ठाकरे सगळ्यांशी चर्चा करणार आहेत.
शुक्रवारी सर्व आमदारांना मातोश्रीवर बोलविण्यात आलं असून या बैठकीत उद्धव ठाकरे आमदारांना वस्तुस्थिती सांगणार आहेत. या बैठकीत ते कुठला संदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुक्रवारी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.