प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी
मुंबई, 13 नोव्हेंबर : अवनी वाघीण हत्याप्रकरणात शिवसेना मंत्री कॅबिनेटमध्ये आक्रमक झाले आहेत. मंगळवारी आयोजित राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अवनीवरून खडाजंगी पेटली आहे. यात शिवसेना मंत्र्यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
शिवसेनेचे मंत्री रामदास कदम यांनी अवनीचा मुद्दा बैठकीत लावून धरला आणि त्यावर त्यांना शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांनी पाठिंबा दिला. त्यात मंगळवारच्या या बैठकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे उशिरा पोहचले आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मांडली पण तोपर्यंत कॅबिनेटमध्ये चांगलंच वातावरण तापलं होतं.
अवनीला मारल्या प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्यात यावी. ज्यांनी मारलं ते देखील चौकशी समितीमध्ये आहेत. त्यामुळे ही समिती नको
अशी उद्धव ठाकरे यांची भूमिका आम्ही कॅबिनेटमध्ये मांडली असं रामदास कदम म्हणाले आहेत.
दरम्यान, केंद्र आणि राज्य सरकारकडून अवनीच्या मृत्यू संदर्भात चौकशी करण्यासाठी दोन स्वतंत्र समित्या नेमण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची एक समिती तर राज्याच्या वन विभागाकडून चौकशीसाठी एक समिती नेमली आहे.
प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. त्यामुळे अवनीबद्दल नेमकं काय झालं याचा खुलासा आता होणार अशी आशा व्याघ्रप्रेमींनी व्यक्त केली आहे.
वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सदस्य बिलाल, वन्यजीव संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष अनिष अंधेरीया हे समितीचे सदस्य असून अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री नितीन काकोडकर समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत.
तर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाची एक समिती सदस्य नेमण्यात आली आहे. त्यात ओ पी कालेर, जाईस लुईस आणि हेमंत कामडी काम पाहणार आहेत.
गुरुवारी आलेल्या शवविच्छेदन रिपोर्टनुसार अवनीला बेशुद्ध न करता थेट गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्यामुळे यातून वनविभागाचा भोंगळा कारभार सगळ्यांसमोर उघड झाला होता. त्यावर आता स्पष्टीकरण देण्यासाठी या समित्या नेमण्यात आल्या आहेत.
VIDEO: मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर आधी फुलांचा वर्षाव नंतर सुनावले खडे बोल!