सोमवारी सत्तास्थापनेचा दावा, 'या' तारखेला होणार शपथविधी!

सोमवारी सत्तास्थापनेचा दावा, 'या' तारखेला होणार शपथविधी!

शुक्रवारी शरद पवार हे मुंबईत येण्याची शक्यता असून ते उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

  • Share this:

प्रशांत लीला रामदास, नवी दिल्ली 21 नोव्हेंबर : गेल्या महिनाभरापासून निर्माण झालेली सत्तास्थापनेची कोंडी फुटण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. शुक्रवारी (22 नोव्हेंबर) मुंबईत काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेची संयुक्त बैठक होणार असून त्यात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. आज दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे नेते पृथ्विराज चव्हाण यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सर्वच मुद्यांवर एकमत झालं असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे आता सगळं लक्ष शिवसेनेवर केंद्रीत होणार आहे. पुढची रणनीती काय असावी यावरही शिवसेनेसोबत चर्चा होणार असून सत्तास्थापनेचा दावा आणि शपथविधीची तारीखही ठरवली जाणार आहे.

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांची उद्या शुक्रवारी मुंबईत भेट होणार आहे. शिवसेना सोबत बैठक झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी सर्व नेते सोमवारी राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. तर 27 नोव्हेंबर पर्यंत शपथविधी होईल अशीही शक्यता व्यक्त केली जातेय.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत, मात्र फॉर्म्युला अजुनही गुलदस्त्यात

उद्धव ठाकरेंवर एकमत

शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकमत झाल्याने आता चर्चेचा केंद्रबिंदू शिवसेनेत राहणार आहेत. मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्यावर या दोनही पक्षांचं एकमत झाल्याने शिवसेनेसाठी तो मोठा दिलासा ठरणार आहे. तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद हे अडीच-अडीच वर्ष वाटून घेतलं जाणार का हे अजुन गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता शिवसेनेत घडामोडींना वेग येणार असून शुक्रवारच्या आमदारांच्या बैठकीत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं होतं.

पण आता परिस्थिती बदलल्याने उद्धव ठाकरे यांचं नाव शिवसेनेत घेतलं जातंय. आदित्य हे तरुण आहेत त्यांनी थोडा अनुभव घेतला पाहिजे असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे उद्धव ठाकरेंनीच मुख्यमंत्री व्हावं असा आग्रह शिवसेना नेत्यांनी धरलाय. उध्दव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही तर शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि उद्धव यांचे विश्वासू सुभाष देसाई यांचंही नाव आघाडीवर आहे.

सत्तास्थापनेचं केंद्र दिल्लीतून मुंबईत, काँग्रेसच्या नेत्यांसाठी विशेष विमान

एकनाथ शिंदे हे मोठं जनसमर्थन असलेले नेते आहेत. ठाण्यात त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहेत ही त्यांची बलस्थानं असली तरी त्याच गोष्टी त्यांच्या विरोधातही जावू शकतात. तर सुभाष देसाई हे उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आहेत. ते त्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही याची पूर्ण खात्री मातोश्रीला असल्याने त्यांचं नावही पुढे येवू शकते. मात्र त्यांना इतर नेते आणि आमदारांचं कितपत सहकार्य मिळू शकते याविषयी शंका व्यक्त केली जातेय. त्यामुळे पुढचे काही दिवस हे शिवसेनेत घडामोडींचे राहणार असून पक्षासाठी ते निर्णायक ठरणार आहेत. त्यातच सेनेच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांमध्ये स्पर्धा असल्याने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर इतर नेत्यांमध्ये नाराजी राहणार नाही अशीही भावना आहे.

 

Published by: Ajay Kautikwar
First published: November 21, 2019, 7:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading