शीला दीक्षित यांची 'दिल्लीवाली' प्रेमकहाणी, बसमध्ये केलं प्रपोज

शीला दीक्षित यांची 'दिल्लीवाली' प्रेमकहाणी, बसमध्ये केलं प्रपोज

दिल्लीच्या सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्या दिल्लीच्या राजकारणातल्या दिग्गज नेत्या होत्या. शीला दीक्षित यांना 'दिल्ली की दादी' असं म्हणत असत. त्यांनी सिटीझन दिल्ली : माय टाइम्स, माय लाइफ या पुस्तकात त्यांच्या प्रेमकहाणीबद्दल लिहिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जुलै : दिल्लीच्या सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनाची बातमी ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. त्या दिल्लीच्या राजकारणातल्या दिग्गज नेत्या होत्या. शीला दीक्षित यांनी 'दिल्ली की दादी' असं म्हणत असत. त्यांनी सिटीझन दिल्ली : माय टाइम्स, माय लाइफ या पुस्तकात त्यांच्या जीवनाबद्दल लिहिलं आहे.

राजकारणातल्या या आयर्न लेडी ने विनोद दीक्षित यांच्याशी जुळलेल्या प्रेमकहाणीबद्दलही अगदी खुलेपणाने लिहिलं आहे. शीला दीक्षित म्हणतात, 'अगदी पहिल्या नजरेतच आमचं प्रेम जडलं होतं पण तरीही मला दोन वर्षं वाट पाहावी लागली. प्राचीन भारतीय इतिहासाचा अभ्यास करताना माझी ओळख विनोद दीक्षित यांच्याशी झाली. वर्गातल्या 20 विद्यार्थ्यांपेक्षा विनोद खूपच वेगळे होते.'

काँग्रेसच्या नेत्या शीला दीक्षित यांचं निधन

शीला दीक्षित लिहितात, 'उंचेपुरे विनोद कॉलेजच्या सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. ते चांगले क्रिकेटरही होते. योगायोगाने एका मित्राच्या प्रेमातले वाद सोडवण्यासाठी आम्ही मदत केली आणि एकमेकांच्या जवळ आलो.'

त्या म्हणतात, मला विनोद यांच्याशी बोलायचं असे पण मी अबोल स्वभावाची आणि विनोद खुल्या विचारांचे, हसतमुख आणि सगळ्यांमध्ये मिळून मिसळून वागणारे होते. एकदा मनातली गोष्ट त्यांना सांगण्यासाठी शीला दीक्षित यांनी दिल्ली ट्रान्सपोर्टच्या बसमधून त्यांच्यासोबत प्रवास केला. मग फिरोजशाह रोडवरच्या आपल्या मावशीच्या घरी त्यांनी सोबत वेळ घालवला.

विनोद यांनी बसमध्येच शीला दीक्षित यांना लग्नाची मागणी घातली. विनोद त्यांची अंतिम वर्षाची परीक्षा देणार होते तेव्हा एक दिवस त्यांनी 10 नंबरच्या बसमध्ये चाँदनी चौक जवळ शीला यांना सांगितलं, मी माझ्या आईला सांगणार आहे की मी एका मुलीशी लग्न करायचा निर्णय घेतला आहे. शीला दीक्षित यांनी त्यांना विचारलं, पण त्या मुलीच्या मनातलं तुम्हाला माहीत आहे का ? यावर विनोद म्हणाले, नाही पण ती मुलगी या बसमध्ये माझ्यासमोर बसली आहे !

शीला यांनी यानंतर त्यांच्या आईवडिलांना विनोद यांच्याबद्दल सांगितलं. पण विनोद तेव्हा अजूनही शिकत होते. त्यामुळे हा संसार चालणार कसा अशी चिंता त्यांच्या आईवडिलांना होती. या सगळ्यात लग्नाची बोलणी मागे पडली. शीला यांनी मोतीबागेत एका मैत्रिणीच्या आईच्या नर्सरी स्कूलमध्ये नोकरी धरली आणि विनोद आयएएस परीक्षेच्या तयारीला लागले. या काळात त्यांची भेटही होत नसे. एक वर्षानंतर मात्र विनोद दीक्षित आयएएस परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांना उत्तर प्रदेश कॅडर मिळालं.

दोन वर्षांनी लग्न

शीला दीक्षित यांनी या पुस्तकात विनोद यांचे वडील उमाशंकर दीक्षित यांच्याबदद्लही लिहिलं आहे. विनोद यांनी जेव्हा शीला दीक्षित यांना उमाशंकर दीक्षित यांना भेटायला नेलं तेव्हा शीला दीक्षित काहीशा धास्तावलेल्या होत्या. उमाशंकर दीक्षित यांनी शीला यांना काही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तरं त्यांच्या पसंतीस उतरली. ते म्हणाले, तुम्हाला कदाचित दोन आठवडे, दोन महिने किंवा दोन वर्षं वाट पाहावी लागेल. कारण विनोद यांच्या आईचा आंतरजातीय विवाहाला विरोध होता. या सगळ्यामध्ये दोन वर्षं गेली पण अखेर 11 जुलै 1962 रोजी या दोघांचं लग्न झालं आणि ही प्रेमकहाणी प्रत्यक्षात अवतरली.

===============================================================================================

VIDEO : शीला दीक्षित यांचं निधन, दिल्लीतल्या एका राजकीय पर्वाचा अस्त!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 06:15 PM IST

ताज्या बातम्या