'युवा जोश'चा नारा देणाऱ्या राहुल गांधींनी 80 वर्षांच्या महिला नेत्याला दिलं नवं पद!

'युवा जोश'चा नारा देणाऱ्या राहुल गांधींनी 80 वर्षांच्या महिला नेत्याला दिलं नवं पद!

अनेक तरुण नेत्यांची दावेदारी असताना दीक्षितांच्या या नियुक्तीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 10 जानेवारी :काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शला दीक्षित यांना दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं आहे. 80 वर्षांच्या शीला दीक्षित या आता लोकसभेसाठी आणि नंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला विजय मिळवून देण्यासाठी झटणार आहे. अनेक तरुण नेत्यांची दावेदारी असताना दीक्षितांच्या या नियुक्तीमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी प्रकृतीच्या कारणांमुळे राजीनामा दिला होता. त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ही नियुक्ती केली. माकन यांनी प्रकृतीचं कारण दिलं असलं तरी अंतर्गत राजकारणामुळे त्यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे.

2014 मध्ये काँग्रेसने एक व्हिडीओ तयार करून काँग्रेस हा पक्ष कसा तरुणांचा आहे, काँग्रेसचे विचार कसे नवे आणि तरुणांना अनुकूल आहेत असा संदेश दिला होता. त्यावरून राहुल गांधींचं तरुण नेतृत्व रूजविण्याचा प्रयत्नही केला गेला. पण आता शीला दीक्षितांची नियुक्ती, सचिन पायलट यांना राजस्थानात दिलेलं उपमुख्यमंत्रीपद आणि मध्य प्रदेशात संधी असतानाही ज्योतिरादित्य शिंदे यांना डावलून कमलनाथ यांना संधी देणं या घटनांमुळे काँग्रेसमध्ये तरुण आणि ज्येष्ठ असा संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तरुणांना चांगल्या संधी दिल्या जातील असं बोललं जात होतं. मात्र तसं होताना दिसत नसल्याचाही आरोप होतोय. दीक्षितांनी पक्षात आणि केंद्रातली अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळला. 10 वर्ष दिल्लीचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं त्यामुळे ही संधी तरुण नेत्याला द्यायला पाहिजे होती असं मत काँग्रेसचे नेते खासगीत व्यक्त करत आहेत.

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आप आदमी पक्षाचा पाठिंबा घेण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर माकन यांनी राजीनामा दिल्याचं बोललं जातंय. शीला दीक्षित यांच्या कार्यकाळातच दिल्लीत काँग्रेसची प्रतिमा खालावली होती. कॉमनवेल्थ घोटाळ्यामुळे त्यांच्या सरकारला मोठा डाग लागला होता. भ्रष्टाराचे अनेक आरोप त्यांच्यावर झालेत.

या आरोपांमुळेच आप ला चांगली संधी मिळाली आणि त्यांनी काँग्रेसचं दहा वर्षांचं सरकार खाली खेचलं. दिल्लीत आप मजबूत असताना 80 वर्षांच्या शीला दीक्षित किती सक्षमपणे काँग्रेसची धुरा सांभाळतील याबद्दल काँग्रेसमधूनच शंका व्यक्त करण्यात येत आहे.

2017 मध्ये झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीत काँग्रेसने शीला दीक्षितांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करून ब्राम्हण कार्ड खेळलं होतं. पण ते मुळीच चाललं नाही. त्यानंतर दीक्षित या सक्रिय राजकारणातून थोड्या बाजूला झाल्या होत्या. माकन आणि त्यांच्यांत मतभेदही होते.

भाजपचं मोठं आव्हान असताना आणि आप सारखा पक्ष प्रतिस्पर्धी असताना शीला दीक्षित यांच्या नियुक्तीमुळे काँग्रेसची कसोटी लागणार आहे.

First published: January 10, 2019, 6:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading