नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : माजी संरक्षणमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवाई दलाला सलाम केला आहे. पाक व्याप्त काश्मीरमधून ज्या दहशतवादी कारवाया केल्या जातात त्याचा भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर दिलं असं ट्विट शरद पवारांनी केलं आहे.
भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या कारवाईमध्ये 200 ते 300 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तब्बल 21 मिनिटं भारतीय हवाई दलानं दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं 1 हजार किलोचा बॉम्ब दहशतवाद्यांच्या तळावर फेकला. दरम्यान, या हल्ल्यानंतर काँग्रेसचे अध्ययक्ष राहुल गांधी यांनी भारतीय हवाई दलानं केलेल्या कामगिरीवर 'भारतीय वायु दलाच्या पायलटांना माझा सलाम' असं ट्विट केलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर देखील राहुल गांधी यांनी कोणतंही राजकारण न करता आम्ही सरकारच्या पाठिशी ठाम उभे असल्याचं म्हटलं होतं.
पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं दहशतवाद्यांना धडा शिकवायला सुरूवात केली आहे. अखेर भारतीय हवाई दलानं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केलं. यावेळी भारतीय हवाई दलानं दहशतवादी तळावर 1000 किलोचा बॉम्ब फेकला. त्यामुळे दहशतवाद्यांचं मोठं नुकसान झालं. एएनआयनं याबद्दलची माहिती दिली. मिराज विमानांनी पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून ही कारवाई केली.
भारतीय लढाऊ विमानांनी LoC पार करून पाकव्याप्त काश्मिरात प्रवेश केला. भारताकडून 'जैश- ए- मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याबाबत अद्याप भारतीय वायूसेनेकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र लवकरच वायूसेनेकडून याबाबत माहिती देण्यात येण्याची शक्यता आहे.
सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारताकडून दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याचा विचार सुरू होता. त्याचाच एक भाग म्हणून भारताकडून हा हल्ला करण्यात आल्याचं बोललं जात होतं