नवी दिल्ली 30 मे : राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चेंना उधाण आलंय. राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू असल्याचीही चर्चा आहे. मात्र शरद पवारांनी या चर्चेला पूर्णविराम दिलाय. विलिनीकरणाबाबात कुठलीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केलं.
पवार म्हणाले, महाराष्ट्रातील निवडणुकी संदर्भात विश्लेषणात्मक चर्चा राहुल गांधी यांच्या सोबत झाली. राज्यातील दुष्काळाच्यासंदर्भातही आम्ही बोललो. मात्र इतर विषयांवर चर्चा झाली नाही.
काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी दुसरा पर्याय सध्याच दिसत नाही त्यामुळे यावेळी राहून गांधी यांनी राजीनामा देणे योग्य नाही असंही आपण राहुल यांना सांगितल्याचं पवार म्हणाले.
राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली तेव्हा त्यांनी सांगितले की विरोधी पक्षांनी ठरवावे की जर EVMवर निवडणूक होत असेल तर निवडणूक लढू नये पण हे ठाकरेच करू शकतात. आम्हाला हे जमणार नाही असंही पवारांनी स्पष्ट केलं.
नेमकं काय झालं?
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याबाबत या भेटीत चर्चा होत आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे देशाच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळू शकते.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या इतपतही काँग्रेसला जागा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीन केल्यास विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा होऊ शकतील.