मराठी बातम्या /बातम्या /देश /शरद पवार : भाजपच्या पराभवानंतर आता राजकीय धुरंधराचा हा डाव बदलणार गणितं

शरद पवार : भाजपच्या पराभवानंतर आता राजकीय धुरंधराचा हा डाव बदलणार गणितं

नेहमीप्रमाणे चाणाक्ष शरद पवार यांनी आपले पत्ते इतक्यात उघडे करण्यास नकार दिला आहे.

नेहमीप्रमाणे चाणाक्ष शरद पवार यांनी आपले पत्ते इतक्यात उघडे करण्यास नकार दिला आहे.

    मुंबई, 12 डिसेंबर : येत्या काळात सत्ताधारी भाजपवर मात करायची असेल तर युती आणि आघाडीला पर्याय राहणार नाही. छोटे आणि प्रादेशिक पक्षांचं वजन वाढणार आहे. विरोधकांचे खरे ऐक्‍य हे निवडणुकांच्या निकालांनंतरच होऊ शकते. ही वक्तव्यं आहेत महाराष्ट्रातल्या सर्वांत सीनियर आणि प्रबळ नेत्याची... या राजकीय धुरंधराची भूमिका पुढच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकते असं आतापासून बोललं जातंय.

    राज ठाकरे, नारायण राणे, राजू शेट्टी, संजय काकडे यांच्यापासून ते अगदी ममता बॅनर्जी एम. के. स्टॅलिन, चंद्राबाबू नायडू, फारुख अब्दुल्ला, नितीश कुमार, शरद यादव आणि अगदी तेजस्वी यादवपर्यंत अनेक राज्यांच्या अनेक पक्षांच्या संपर्कात असलेले हेच महाराष्ट्रातले प्रबळ नेते अर्थातच शरद पवार. गेल्या काही काळात शरद पवार या यादीतल्या सगळ्यांना आणि आणखीही काही नेत्यांना भेटले. तिसऱ्या आघाडीची शक्यता चाचपडून बघताना अशी आघाडी झालीच तर त्यात महत्त्वाची भूमिका महाराष्ट्राचा हाच मुरलेला राजकारणी निभावणार असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

    मोदींनी पंतप्रधानपदाचा आब राखला नाही : शरद पवार

    पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालानंतर आता काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावताना दिसतोय. दुसरीकडे तिसऱ्या आघाडीच्या चर्चा करणाऱ्या नेत्यांना मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली चाललेली काँग्रेसची घोडदौड धक्का देऊ शकते. म्हणूनच आघाडीच्या राजकारणात मुरलेल्या जुन्या जाणत्या शरद पवारांचं महत्त्व या प्रादेशिक पक्षांना पुन्हा एकदा जाणवणार हे नक्की आहे.

    शेवटची संधी?

    शरद पवार यांचं लक्ष दिल्लीच्या तख्ताकडे आहे आणि 2019च्या लोकसभा निवडणुका ही त्यांच्यासाठी अखेरची संधी असल्याचं मानलं जातंय. राष्ट्रवादीचे नेते आणि शरद पवार यांच्या खास मर्जीतले कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांनी यापूर्वीच पुढच्या लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार पंतप्रधान होतील, असं म्हटलं होतं. पवार स्वतः मात्र याबाबत उघडपणे काही बोललेले नाहीत. उलट त्यांनी पुढची लोकसभा निवडणूक लढवणार नाही, असंही त्यांनी जाहीर केलंय.

    जागा कमी तरीही

    2009च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. प्रत्यक्षात पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या जागा आणि पवारांचं राजकीय वजन याचं प्रमाण व्यस्तच राहिलं आहे आणि तेच पवार यांच्यासारख्या राजकीय धुरंधराचं वैशिष्ट्य आहे. प्रत्यक्षात प्रभावाचं क्षेत्र तुलनेनं कमी आणि दक्षिणेतल्या पक्षांच्या तुलनेत दिल्लीत पवारांच्या पक्षाच्या जागा कमी, तरी त्यांचं महत्त्व मात्र दिवसेंदिवस वाढणारं आहे.

    काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत

    महागठबंधन झालंच तर त्यात शरद पवार यांची मध्यवर्ती भूमिका राहील याबाबत शंका नाही. कारण शब्दशः काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व प्रादेशिक नेत्यांशी शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत. हे सगळे नेते पवार यांना मानतात.

    वर्षाच्या सुरुवातीपासूनच तिसऱ्या आघाडीच्या हालचालींना पडद्यामागून सुरुवात झाली होती. त्याला खरा वेग आला चंद्राबाबू नायडू राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडल्यानंतर. चंद्राबाबूसुद्धा आता या कथित तिसऱ्या आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. कारण सत्ताधारी एनडीएचे निमंत्रक चंद्राबाबूच होते. आता मात्र एनडीएतून बाहेर पडल्यानंतर ते भाजपविरोधाची तलवार घेऊनच उभे आहेत. पण उत्तर आणि दक्षिण भारतातल्या प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध असणाऱ्या पवारांची या महागठबंधनसारख्या राजकीय गणितांमध्ये जेवढी विद्वत्ता आहे तेवढी इतर कुणाचीही नाही. म्हणूनच बंगालच्या ममता बॅनर्जी यांनी तिसऱ्या आघाडीच्या चाचपणीसाठी त्या वेळी प्रथम पवारांची भेट घेतली होती.

    महागठबंधनावर प्रभाव

    शेतकरी लाँग मार्चच्या निमित्ताने दिल्लीत नुकतेच विरोधी पक्ष एकत्र आले होते. त्या वेळी अगदी आपच्या अरविंद केजरीवालांपासून डाव्या सीताराम येचुरींपर्यंत सगळे भाजपविरोधात एकत्र आले. अर्थातच त्या वेळी शरद पवार यांची सगळ्यांशी भेट झाली.

    12 डिसेंबर  1940चा जन्म असलेले पवार बुधवारी 78 वर्षांचे झाले. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्वच राजकीय पुढारी कुठलेही वाद, मतभेद मनात न ठेवता त्यांना शुभेच्छा देते झाले. अगदी भाजपचे पुण्यातले खासदार संजय काकडेसुद्धा त्यांना शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने पवारांच्या गाडीत बसून चर्चा करूनच पुढे गेले. इथून पुढच्या काळात त्यांचं राजकीय वजन आणखी वाढणार हेच यातून दिसतंय.

    ईशाच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात सगळ्या अंबानी कुटुंबीयांनी केला परफॉरमन्स

    First published:

    Tags: BJP, Congress, NCP, NDA, Third front, महागठबंधन, शरद पवार