• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • दिल्लीत उद्या काय होणार? शरद पवार राजधानीत; मोदींना भेटणार का?

दिल्लीत उद्या काय होणार? शरद पवार राजधानीत; मोदींना भेटणार का?

Coronavirus च्या साथीतही राजकारणाचे वारे बदलू शकतात, हे मध्य प्रदेश आणि आता राजस्थानसारख्या राज्यांनी दाखवून दिलं आहे. उद्या राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेण्याच्या निमित्ताने पवार दिल्लीत अनेक राजकीय धुरिणांना भेटण्याची शक्यता आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 21 जुलै : Coronavirus च्या साथीतही राजकारणाचे वारे बदलू शकतात, हे मध्य प्रदेश आणि आता राजस्थानसारख्या राज्यांनी दाखवून दिलं आहे. त्यामुळे आता दिल्लीत उद्या कोणते राजकीय रंग दिसणार याविषयी राजधानीत चर्चा सुरू आहे. बुधवारी (21 जुलै) राज्यसभेचे खासदार शपथ घेतील. Covid च्या पार्श्वभूमीवर किती नवनिर्वाचित खासदार दिल्ली दरबारी पोहोचणार यात शंका आहे, पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्रातल्या महाआघाडीचे शिल्पकार ठरलेले शरद पवार मात्र आजच संध्याकाळी दिल्लीत पोहोचले आहेत. शरद पवार यांचा दिल्लीतला कार्यक्रम काय असेल याची अधिकृतरीत्या माहिती देण्यात आलेली नाही. पण ते काही खासगी भेटीगाठी घेऊ शकतात, असं समजतं. कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट पवार घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. महाराष्ट्रातलं सरकार स्थिर आहे, असं वारंवार सांगणाऱ्या महाविकासआघाडीत सगळं काही आलबेल आहे की नाही हे मंत्र्यांना आणि आमदारांनाच माहीत. पण महाराष्ट्राच्या बड्या नेत्यांच्या दिल्लीवारीच्या बातम्या आल्या की, अफवांना हमखास पेव फुटतं. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नुकसाच दिल्ली दौरा केला. मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस होणार का, अशी चर्चा तेव्हा रंगली होती. पण फडणवीसांनी या चर्चांना काही अर्थ नाही, असं म्हणत त्या फेटाळल्या. "आम्ही महाराष्ट्रातलं सरकार पाडणार नाही. त्यात रस नाही. सरकारच आपसांतल्या मतभेदांमुळे पडेल", असं मात्र ते म्हणाले.  फडणवीसांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली. अमित शाहांबरोबरची भेट अनौपचारिक होती, असं ते म्हणाले. महाराष्ट्रातल्या साखर उद्योगाला मदत मिळावी, अशी विनंती त्यांनी दिल्लीत जाऊन केली. आता शरद पवार दिल्लीत दाखल झाल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. कोरोना कालावधीत आता संसदेचं  पावसाळी अधिवेशन केव्हा  सुरू होईल हे अद्याप निश्चित नाही. पण राज्यसभेवर निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी मात्र होईल.   उद्या  बुधवारी सुमारे 43 नवीन राज्यसभा खासदार शपथ घेतील, अशी माहिती आहे. त्याचसाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले आहेत. उद्या भाजपचे 18, कॉंग्रेसचे 10 आणि इतर काही पक्षांचे 43 खासदार राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतील. एकूण 61 नवीन खासदारांना शपथ घ्यावी लागणार आहे. पण कोरोनाच्या वातावरणामुळे काही खासदार दिल्लीत येता येणार नाही. कोण घेणार शपथ? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतील. मध्य प्रदेशात सत्तेचे फासे पलटण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा होता ते कॉंग्रेसचे माजी नेते ज्योतिरादित्य शिंदे आता भाजप खासदार म्हणून शपथ घेतील. शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदीही पहिल्यांदा खासदारकीची शपथ घेतील. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, काँग्रेसचे राजीव सातव, डॉ भागवत कराड, उदयनराजे भोसले आदी शपथ घेण्याची शक्यता आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या फौजिया खान यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे त्या उपस्थित राहण्याची शक्यता कमी आहे.
  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published: