मुंबई, 10 जून : साहित्य जगतात पौराणिक कथांचा ट्रेंड आला आहे, अमिश त्रिपाठी यांची शिव ट्रायालॉजी सगळ्यांच्या पसंतीला उतरल्यानंतर सीता, राम आणि रावण यांच्यावरही पुस्तकं आली. आनंद नीलकंठन यांच्या असुर, अजेय आणि वानर या पुस्तकांनाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
याच ट्रेंडमध्ये महाभारतावर आधारित असलेलं आणखी एक पुस्तकही चर्चेत आहे. शकुनी : मास्टर ऑफ द गेम. या पुस्तकाचे लेखक आहेत मध्य प्रदेशचे पत्रकार आशुतोष नाडकर. या पुस्तकात मध्यवर्ती व्यक्तिरेखा शकुनी मामाची आहे. कांदबरीच्या रूपात वाचकांसमोर आलेलं हे पुस्तक शकुनीचं आत्मकथन आहे.
शकुनिच्या नजरेतून महाभारत
महाभारत हे महाकाव्य खरंच अद्भूत आहे. यातल्या प्रत्येक पात्राचा एक वेगळाच दृष्टिकोन आहे. श्रीकृष्णाच्या व्यक्तिरेखेपासून ते भीष्म, कुंती, अर्जुन, भीम, युधिष्ठीर, कर्ण, द्रौपदी, गांधारी, दुर्योधन, द्रोण, अश्वत्थामा अशा व्यक्तिरेखांच्या चरित्रांवर आधारित कथा कादंबऱ्या लिहिल्या गेल्या आहेत. पण या महाकाव्यामधलं एक महत्त्वाचं पात्र असलेल्या शकुनीच्या व्यक्तिरेखेकडे काहिसं दुर्लक्षच झालं होतं. या व्यक्तिरेखेचं चित्रण थोडं वरवरचं आणि खलनायकाच्या रूपातच केलं गेलं आहे.
प्रत्येक खलनायकामध्ये एक नायक दडलेला असतो. त्याचप्रमाणे शकुनीच्या व्यक्तिरेखेचं सूक्ष्म अवलोकन केलं तर शकुनीच्या व्यक्तिरेखेमधली नकारात्मकता कमी होते. शिवाय त्याच्याविषयी आपल्या मनात सहानभूती निर्माण होते.
महाभारताची मूळ कथा तशीच
शकुनी : मास्टर ऑफ द गेम या पुस्तकात महाभारतातली मूळ कथा तशीच ठेवण्यात आली आहे. महाभारतातल्या ज्या घटनांबद्दल आपल्याला माहीत आहे त्याच घटना यामध्ये चित्रित करण्यात आल्या आहेत. पण त्या घटना शकुनीच्या दृष्टिकोनातून मांडल्या आहेत. त्यामुळे या पुस्तकाची कहाणी रंजक बनते.
शकुनीला यामध्ये जबरदस्तीने नायकही बनवण्यात आलेलं नाही. महाभारतातला घटनाक्रम रंजक पद्धतीने मांडून खलनायक समजल्या जाणाऱ्या शकुनीची बाजू यात मांडण्यात आली आहे. प्रत्येक घटनेचं तार्किक विश्लेषण करण्यात आलं आहे.
शकुनीचे वाचकांना प्रश्न
पुस्तकाच्या सुरुवातीलाच शकुनी वाचकांना प्रश्न विचारतो. महाभारतातल्या कथेत अधर्म करणाऱ्या एकापेक्षा एक व्यक्तिरेखांना नायकाचा दर्जा दिला जातो. मग मीच असं काय केलं आहे की मलाच महाभारतातला सगळ्यात मोठा खलनायक म्हटलं जातं ?
या पुस्तकाची कथा जसजशी पुढे सरकत जाते तसंतसं शकुनि हा भीष्म, कुंती, युधिष्ठीर, कर्ण, द्रोण, विदुर या सगळ्यांकडे तार्किक पद्धतीने काही प्रश्नांची उत्तरं मागतो. जर एखादी योजना विदुराची असेल तर त्याला विदुरनीती म्हणतात. कृष्णाबद्दल काही असेल तर त्याला कृष्णलीला म्हणतात. पण शकुनिच्या बाबतीत मात्र त्याला षड्यंत्र म्हटलं जातं, अशी कैफियतही शकुनी मांडतो.
शकुनीच्या नजरेतून महाभारत जाणून घेताना आपल्याही मनात काही प्रश्न उपस्थित होतात. जर तुम्हाला पौराणिक कथांमध्ये रस असेल तर हे पुस्तक तुम्हाला नक्कीच आवडेल.
=========================================================================================
VIDEO : कारकिर्दीवर चित्रपट येणार का? युवराज सिंग म्हणतो...