शबरीमला, वैष्णोदेवीचा प्रसाद घरपोच मिळणार; पोस्ट खात्याची विशेष सुविधा

शबरीमला, वैष्णोदेवीचा प्रसाद घरपोच मिळणार; पोस्ट खात्याची विशेष सुविधा

कोरोनामुळे (Corona) आपल्याला तीर्थस्थळी जाता येत नाही. पण तुमच्या दैवताचा प्रसाद तुम्हाला घरबसल्याही मिळेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: भारतीय पोस्ट (Indian Post) खात्यानं आता शबरीमला मंदिरातील (Sabarimala Temple) स्वामी अयप्पा भगवानांचा प्रसाद घरपोच (Home Delivery) देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या कोविड 19 च्या साथीमुळे लोक मंदिरांमध्येही जात नाहीत. त्यामुळे मंदिरांनी भाविकांसाठी घरबसल्या देव दर्शन, आरती या सेवा ऑनलाईन उपलब्ध केल्या आहेत, त्याचबरोबर आता भारतीय पोस्ट खात्याच्या सहकार्यानं प्रसादही घरपोच मिळण्याची सोय उपलब्ध केली आहे.

कोविड 19 च्या साथीमुळे लोकांची जीवनशैली आणि व्यवसाय करण्याची पद्धत यात खूप बदल झाला आहे. ऑफीसचं काम, मुलाचं शिक्षण आणि शॉपिंगही ऑनलाईन केलं जात आहे. देशभरातील प्रसिद्ध देवस्थानांनीही आधुनिक तंत्रज्ञांनाचा लाभ घेत, भाविकांना घरबसल्या देवदर्शनाची ऑनलाईन सुविधा दिली आहे. आता भाविकांना घरपोच प्रसाद पाठवण्याची सुविधाही मंदिरांमार्फत केली जात आहे. यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे ते भारतीय पोस्ट खाते. पोस्ट खात्याच्या मदतीने माता वैष्णोदेवी मंदिरासह  (Mata Vaishno Devi) शबरीमला येथील स्वामी अयप्पा मंदिरातूनही भाविकांना घरपोच प्रसाद पाठविण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे.

पोस्ट खात्याच्या मदतीने घरपोच प्रसाद सेवा

सहा नोव्हेंबरपासून पोस्ट खात्यानं (Indian Post Department) शबरीमला मंदिरचा प्रसाद भाविकांना घरपोच देण्याची सुविधा सुरू केली आहे. यासाठी केरळ पोस्टल सर्कल आणि त्रावणकोर देवास्वम बोर्ड यांच्यात एक करार करण्यात आला आहे. यानुसार, कोणीही व्यक्ती 450 रुपये भरून या मंदिराचा प्रसाद घरी मागवू शकते. या प्रसादाच्या पाकिटात अर्वना, तूप, अंगारा (विभूती), हळद, कुंकू आणि प्रसाद असतो. एक व्यक्ती एका वेळेला दहा पाकिटे मागवू शकते. यासाठी नोंदणी करताच स्पीड पोस्टचा एक मेसेज भाविकांना मिळतो. ज्यामुळे डिलिव्हरी कधी मिळणार याची माहिती मिळते.

पोस्ट खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यत नऊ हजारांहून अधिक ऑर्डर्स नोंदवल्या गेल्या असून, यात सातत्याने वाढ होत आहे. या वर्षीच्या मंडलम यात्रेसाठी भाविकांकरिता 16 नोव्हेंबरपासून शबरीमला मंदिराची द्वारे उघडण्यात आली आहेत; मात्र कोविड 19 च्या साथीमुळे अगदी मर्यादित संख्येत भाविकांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली असून, दर्शनासाठी अनेक नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 3, 2020, 7:42 AM IST

ताज्या बातम्या